लोकमत इफेक्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात वसलेल्या वाडिया कॉलनीमधील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या वृत्ताची दखल मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डने घेतली आहे. वृत्त प्रसिद्ध होताच एल वॉर्डने येथील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले. मात्र, रात्री पडत असलेल्या पावसामुळे खड्डे भरण्याच्या कामात अडथळे आले. तरीही नागरिकांची, वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेच्या एल वॉर्डने हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे.
येथील रस्त्यावरील खड्डे बुजल्याने आता रहदारी व्यवस्थित झाली असून, नागरिकांना आणि वाहन चालकांना होणारा त्रास कमी झाला आहे. येथील समस्यांकडे स्थानिक रहिवासी राकेश पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते आणि ‘लोकमत’च्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडली होती. दरम्यान, पालिकेने युद्धपातळीवर हे काम केल्याने स्थानिक परिसरातून समाधान व्यक्त केले जात असले तरी अशा प्रकारची कामे करताना उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जावे, जेणेकरून पावसाळ्यात पुन्हा यातील साहित्य बाहेर येणार नाही आणि पुन्हा खड्डे पडणार नाहीत, असे म्हणणे स्थानिक परिसरातून मांडले जात आहे.
..............................................