गणेशमूर्ती मिरवणुकांसाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार खड्डे

By सचिन लुंगसे | Published: August 27, 2022 05:22 PM2022-08-27T17:22:18+5:302022-08-27T17:23:02+5:30

अतिरिक्त आयुक्त श्री. पी. वेलरासू यांनी पाहणी दौऱयातून घेतला आढावा

Pits will be filled by rapid hardening concrete method for Ganesha idol processions | गणेशमूर्ती मिरवणुकांसाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार खड्डे

गणेशमूर्ती मिरवणुकांसाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार खड्डे

Next

मुंबई -  सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, श्रीगणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात म्हणून मुंबईतील रस्त्यांवर जोरदार पावसामुळे निर्माण झालेले खड्डे भरून काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कार्यवाहीचा स्वतः अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी आज (दिनांक २७ ऑगस्ट २०२२) सकाळपासून क्षेत्रीय पाहणी करून आढावा घेतला. तसेच गणेशोत्सव कालावधीत रस्ते परिरक्षणाच्या दृष्टीने सर्व संबंधित रस्ते अभियंत्यांना आणि कंत्राटदारांना देखील त्यांनी निर्देश दिले. या विशेष मोहीमेत, रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने विविध रस्त्यावरील खड्डे भरण्यात येत आहेत, त्यामुळे या मोहिमेला वेग मिळाला आहे.

मुंबई महानगरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील गणेशोत्सव समन्वय समिती, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी पार पडली होती. जोरदार पावसामुळे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे लवकरात लवकर भरावेत आणि गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करण्याची विनंती गणेश मंडळांकडून करण्यात आली होती.

याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल आणि अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी नमूद केले होते की, प्रतिवर्षाप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक सुरळीत राखण्यासाठी खड्डे भरण्याची विशेष मोहीम घेतली आहे. तसेच या कामाला वेग देण्यासाठी यंदा रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीचा वापर करून खड्डे भरण्यात येतील, त्यामुळे खड्डा भरल्यानंतर अवघ्या सहा तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येईल, असे प्रशासनाने आश्वस्त केले होते. त्यानुसार मुंबई शहर विभागात ६९६ चौरस मीटर, पूर्व उपनगरांमध्ये ५६० चौरस मीटर आणि पश्चिम उपनगरांमध्ये ९५७ चौरस मीटर असे आतापर्यंत एकून २,२१३ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे खड्डे रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त प्रचलित पद्धतीनुसार देखील खड्डे भरले जात आहेत, जेणेकरून गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडू शकतील.

 दरम्यान, महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल आणि अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा या विशेष मोहिमेतील कार्यवाहीचा आढावा घेतला होता. तसेच सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या भागातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवले जातील, यासाठी स्वतः क्षेत्रीय पाहणी दौरे करावेत, सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांनी देखील गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकांशी संबंधित प्रमुख रस्त्यांची पाहणी करावी, असे निर्देश देखील आयुक्तांनी दिले होते.

यादृष्टीने, प्रत्यक्ष क्षेत्रीय आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज आर-उत्तर, पी-उत्तर, पी-दक्षिण, के-पश्चिम, आणि एच-पूर्व विभागांमध्ये रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी रस्ते विभागाच्या अधिकाऱयांसोबत पाहणी केली. संपूर्ण गणेशोत्सव कालावधी दरम्यान रस्ते खड्डेमुक्त राहावेत, यासाठी रस्ते अभियंत्यांना आवश्यक ते निर्देश देखील श्री. वेलरासू यांनी दिले आहेत. या संपूर्ण पाहणी दौऱयात उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) (प्रभारी) श्री. एम. एम. पटेल आणि संबंधित सर्व उपप्रमुख अभियंता देखील उपस्थित होते. त्यासोबतच, मिलन भूयारी मार्ग (मिलन सबवे) येथे पावसाचे साचणारे पाणी उपसून साठवण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या जलाशयाची पाहणी देखील अतिरिक्त आयुक्त श्री. वेलरासू यांनी अखेरीस केली. यावेळी प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. अशोक मेस्त्री यांनी प्रगतिपथावर असलेल्या या कामाची माहिती दिली.

Web Title: Pits will be filled by rapid hardening concrete method for Ganesha idol processions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.