Join us  

गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवरून धावली पहिली मुंबई-गोवा ट्रेन; पीयूष गोयल यांनी वचन पूर्ण केलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 2:42 PM

Piyush Goyal Inaugurates Mumbai-Goa Train: मुंबईतील पश्चिम उपनगरे आणि गोव्यासह कोकण विभाग यांच्यातील संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने ही नवी सेवा सुरु करण्यात आली आहे.

Piyush Goyal Inaugurates Mumbai-Goa Train: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आजपासून सुरु झालेल्या वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या द्वि-साप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पश्चिम रेल्वेने यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली. "आनंदाचा क्षण...! कोकणासाठी नवीन रेल्वे सेवा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी वांद्रे टर्मिनस ते मडगांव दरम्यानच्या नवीन ट्रेनच्या उद्घाटन सेवेला बोरिवली येथे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवला," या ट्विटसह पश्चिम रेल्वेने ही माहिती दिली.

१७० वर्षांनी घडून आलाय 'शुभयोग'

"पश्चिम रेल्वेला पूर्वी बॉम्बे-बरोडा म्हटलं जायचं. ब्रिटीश लोक मुंबई म्हणत नव्हते. बॉम्बे-बरोडाची पहिली ट्रेन १८५५ मध्ये सुरु झाली होती. १७० वर्षांनी पहिल्यांदा बोरिवली स्टेशनवरून ट्रेन सुरु होत आहे, यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्वण यांचे आभार. तब्बल १७० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता बोरिवलीवरून वसई, पनवेल मार्गे ही रेल्वे थेट कोकणात जाईल. तसेच, वसईत ट्रेनला इंजिन बदलावे लागत होते. पण पंतप्रधान मोदी यांच्या मान्यतेने रेल्वेमंत्र्यांनी ही समस्या संपवण्याच्या दृष्टीने निधी मंजूर केला आहे. नजीकच्या भविष्यकाळात आता इंजिन बदलण्याचीही गरज राहणार नाही. ट्रेन इथून थेट कोकणात आणि पुढे गोव्यापर्यंत जाईल," अशी माहिती पीयूष गोयल यांनी उद्घाटनाच्या वेळी दिली.

पीयूष गोयल यांनी वचन पाळले!

जून महिन्यात पीयूष गोयल यांनी कोकणासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून ट्रेन सोडण्याबाबतची मुंबईकरांची मागणी समजून घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून येत्या गणपतीत रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. गोयल यांनी दिलेला शब्द पाळत गणेशोत्सवाला आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असताना या रेल्वे सेवेचे उद्घाटन करत मुंबईतील कोकणवासीयांना दिलासा दिला. पश्चिम रेल्वे मार्गावरून धावणारी ही पहिली मुंबई-गोवा ट्रेन आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरे आणि गोव्यासह कोकण विभाग यांच्यातील संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने ही नवी सेवा सुरु करण्यात आली आहे.

ट्रेनचे स्वरुप कसे आहे?

२० डब्बे (LHB - Linke Hofmann Busch कोचेस) असलेली ही रेल्वे गोव्यातील मडगांव येथून दर मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटून वांद्रे टर्मिनसला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तर वांद्रे टर्मिनस येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सुटलेली रेल्वे रात्री १० वाजता मडगांवला पोहोचेल. आज या रेल्वेसेवेतील पहिली गाडी बोरिवलीहून दुपारी सुटली. ही रेल्वेगाडी बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळे या स्थानकांवर थांबेल.

टॅग्स :पीयुष गोयलभारतीय रेल्वेपश्चिम रेल्वेमुंबईगोवाकोकणगणेशोत्सव