पीयूष गोयल मुंबईत 'या' मतदारसंघातून लोकसभा लढणार!

By यदू जोशी | Published: February 6, 2024 07:32 AM2024-02-06T07:32:22+5:302024-02-06T07:32:59+5:30

शेट्टी किंवा महाजन यांचा मतदारसंघ

Piyush Goyal will contest Lok Sabha in Mumbai! | पीयूष गोयल मुंबईत 'या' मतदारसंघातून लोकसभा लढणार!

पीयूष गोयल मुंबईत 'या' मतदारसंघातून लोकसभा लढणार!

यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे मुंबईतूनलोकसभा निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यासाठी नेमका कोणता मतदारसंघ योग्य ठरेल याची चाचपणी भाजपकडून केली जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

भाजपच्या पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई, तर गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. या दोनपैकी एका मतदारसंघात गोयल यांना मैदानात उतरवले जाईल, असे मानले जाते. गोपाळ शेट्टी यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा ४ लाख ६५ हजार मतांनी पराभव केला होता. ही जागा भाजपसाठी मुंबईत सर्वाधिक सुरक्षित मानली जाते, तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १ लाख ३० हजार मतांनी पराभव केला होता.

राज्यसभेतील भाजपचे मंत्री असलेले व नसलेले पण ज्येष्ठ खासदार आहेत अशांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी पक्षाने केली आहे. गोयल हे केंद्रातील प्रभावी मंत्री मानले जातात. वाणिज्य, वस्त्रोद्योग, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. गोयल यांना अत्यंत सुरक्षित अशा  उत्तर मुंबईतून लढवायचे की त्यांची क्षमता लक्षात घेऊन उत्तर मध्यमधून लढवायचे, यावर भाजपचे नेतृत्व विचार करत आहे.

सिद्दीकी पिता-पुत्र राष्ट्रवादीत जाणार
nमुंबईतील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
nगेल्या आठवड्यात यासंबंधीच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, दोघांनीही त्याचा इन्कार केला होता.
nतथापि खात्रीलायक सूत्रांनी सांगितले, की सिद्दीकी हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असून लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणावर जोर 
लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असावेत यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण सुरू केले आहे दिल्लीहून नेमलेल्या चार कंपन्या राज्याच्या विविध भागात हे सर्वेक्षण करीत आहेत. मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी कोणते मतदारसंघ सुरक्षित राहतील याचेही सर्वेक्षण केले जात आहे असे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या विद्यमान खासदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन देखील सर्वेक्षणाद्वारे केले जात आहे. 

Web Title: Piyush Goyal will contest Lok Sabha in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.