मुंबई : मुंबई उत्तर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल हे ३० एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत गोयल यांनी आपल्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला असून ते आता दुसऱ्या टप्प्याकडे वळले आहेत.
मात्र, अजूनही विरोधी पक्षाचा उमेदवार ठरला नसून त्याबाबतचा घोळ सुरूच आहे. कोणी उमेदवार देता का उमेदवार, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे.
गोयल यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बोरिवली ते कांदिवली अशी प्रचार रॅली काढण्यात आली. यात भाजपसह शिंदेसेना, मनसे, अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष सहभागी झाले होते. गोयल यांनी आतापर्यंत दहीसर ते मालाड या उत्तर मतदारसंघातील सर्वच्या सर्व म्हणजे दहीसर, मागाठणे, बोरिवली, चारकोप, कांदिवली, मालाड या सहाही मतदारसंघांतील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला आहे.