मुंबई : रेल्वे प्रवासात प्रवाशांना आवडते खाद्यपदार्थ मिळावे यासाठी ई-कॅटरिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेत प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान काही स्थानकांवर पिझ्झाही उपलब्ध करण्यात आला असून आता यामध्ये सीएसटी, नाशिक रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकाचा समावेश रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. प्रवासादरम्यान प्रवाशांची खाण्यापिण्याची गैरसोयच होत असते. रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जाही फारसा चांगला नसतो. हे पाहता प्रवासी त्याकडे पाठच फिरवतात. प्रवाशांना आवडणारे आणि चांगले खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ई-कॅटरिंग सेवा सुरू करण्यात आली. १४३ ट्रेनमध्ये ही सेवा देण्याचा निर्णय घेतानाच आतापर्यंत १३८ ट्रेनमध्ये ई-कॅटरिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. १३८ ट्रेनपैकी १४ तर मध्य रेल्वे मार्गावरील आहेत. यामध्ये एलटीटी-कोच्चुवेली गरीब रथ, जबलपूर-सीएसटी गरीब रथ, दादर-म्हैसूर शरावती एक्स्प्रेस, एलटीटी-अमृतसर एक्स्प्रेस, दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस आणि पुणे-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये सेवा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर नुकतीच ई-कॅटरिंगद्वारे १२ स्थानकांवर पिझ्झा आॅर्डर करण्याचीही सेवा सुरू करण्यात आली होती. यामध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकाही स्थानकाचा समावेश नव्हता. आता आणखी २९ स्थानकांवर पिझ्झा आॅर्डर करण्याची सेवा देण्यात येत असून यामध्ये सीएसटी, नाशिक रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकाचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकांवर मिळणार पिझ्झा
By admin | Published: May 02, 2015 5:08 AM