पु. ल. देशपांडेंच्या पुतळ्याची जागा बदलणार, नवीन अॅम्फी थिएटर उभारणार
By संजय घावरे | Published: April 20, 2024 09:11 PM2024-04-20T21:11:37+5:302024-04-20T21:12:17+5:30
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे बरेचसे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा अकादमीच्या व्यवस्थापनाचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून एप्रिल-मे हे दोन्ही महिने खूप महत्त्वाचे आहेत.
मुंबई : प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिर कात टाकणार असून, नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. अकादमीच्या प्रांगणातील पुलंच्या पुतळ्याची जागा बदलण्यात येणार असून, ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे बरेचसे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा अकादमीच्या व्यवस्थापनाचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून एप्रिल-मे हे दोन्ही महिने खूप महत्त्वाचे आहेत. सध्या ५० ते ६० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील अंतर्गत सजावटीचे काम झाले आहे. रवींद्र नाट्य मंदिर आणि मिनी थिएटरसाठी वातानुकूलित यंत्रणा नवीन बसवण्यात आली आहे. प्लॅस्टर झाले आहे. मेकअप रूम्स मोठ्या करण्यात आल्या आहेत. व्हीआयपी रूमचे प्लॅस्टर झाले असून, रंगकाम बाकी आहे. खुर्च्या अधिक आरामदायी करणार असल्याने पायऱ्यांची उंची थोडीशी वाढवण्यात येणार आहे. रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पूर्वी ९११ आसनक्षमता होती. आरामदायी आसनव्यवस्थेमुळे ती कमी होणार आहे. बाल्कनीनील खुर्च्याही बदलण्यात येणार आहेत.
कलांगण एका नव्या स्वरूपात रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे. याचे डिझाईन तयार आहे. पूर्वी कलांगणात बसणाऱ्या प्रेक्षकांना पु. ल. देशपांडे यांचा पुतळा पाठमोरा उभा असल्यासारखा वाटायचा. आता तो अकादमीच्या कार्यालयाबाहेर उभारण्यात येणार आहे. जेणेकरून पुतळ्याचे तोंड नेहमी कलांगणात होणाऱ्या कार्यक्रमांकडे राहील. पुतळ्याभोवती लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कलांगणाच्या मोकळ्या जागेत अॅम्फी थिएटर करणार आहे. तिथे स्टेडियमसारख्या पायऱ्या असतील आणि साधारणपणे १५० प्रेक्षक बसू शकतील.
जी प्लस सिक्स आणि जी प्लस सेव्हन अशा दोन इमारती असल्याने काम खूप मोठे आहे. आतून-बाहेरून प्लॅस्टर करून सर्व बारीक-सारीक कामे केली जाणार आहेत.
पुरुष आणि स्त्री स्वच्छतागृहे पूर्वी समोरासमोर आणि छोटी होती. ती प्रशस्त करण्यात आली आहेत. दिव्यांगांसाठी वेगळी व्यवस्था आणि लहान मुलांसाठी प्लॅटफॉर्म केला आहे.
स्टेज क्राफ्टच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यात अकॉस्टिक्सपासून प्रकाशयोजनेपर्यंत रंगमंचाशी निगडीत असलेली सर्व कामे केली जाणार आहेत.