पु.ल. युवा महोत्सवाला तरुणाईचा उदंड प्रतिसाद
By admin | Published: November 10, 2015 02:19 AM2015-11-10T02:19:41+5:302015-11-10T02:19:41+5:30
पु.ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या ‘पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’तर्फे आयोजित भव्य स्वरूपाच्या पु.ल युवा महोत्सवाची रविवारी यशस्वी सांगता झाली
मुंबई : पु.ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या ‘पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’तर्फे आयोजित भव्य स्वरूपाच्या पु.ल युवा महोत्सवाची रविवारी यशस्वी सांगता झाली. ५ ते ८ नोव्हेंबर या चार दिवसांदरम्यान नाट्य, नृत्य, कला आणि संगीतक्षेत्रातल्या समकालीन उत्तमोत्तम कार्यक्रमांची आणि कार्यशाळांची रेलचेल महोत्सवात दिसून आली.
यंदाच्या महोत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले त्या मान्यवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालील विविध कलाविषयक कार्यशाळा. मान्यवर प्रशिक्षकांनी घेतलेल्या कार्यशाळांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या निष्णात प्रशिक्षकांच्या कार्यशाळा विनामूल्य होत्या, त्याचा लाभ या क्षेत्रात गुणवत्ता अजमावून पाहण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने घेतला.
शुक्रवारी या महोत्सवात महाकवी कालिदास यांच्या काव्यावर आधारित नृत्यनाटिका ‘ऋतुसंहार’ सादर झाली. गौरी दाढी या भंडाराहून आलेल्या तरुणीने गणपतीवरील अभंग, गाणी, पौराणिक कथांवर आधारित कीर्तन करून प्रेक्षकांची मने जिंकली. याचवेळी नाटक-नेपथ्यकार सुनील देवळेकर यांनी विविध अक्षर गणेश रेखाटून कार्यक्रमात विशेष रंग भरले. ज्योती मतकरी या आळंदीहून आलेल्या कीर्तनकार तरुणीने आजच्या भरकटत चाललेल्या तरुणाईने काय करणे आवश्यक आहे याचे विवेचन करत आपल्या भारदस्त आवाजाने श्रोत्यांचे लक्ष वेधले. गेल्या वर्षी दिग्गज शाहिरांनी गाजवलेला ‘शाहिरी फुलोरा’ हा आगळावेगळा शाहिरी जलसा यंदा युवा मंडळींनी सादर केला.
शनिवारी ‘प्रात:स्वराचे रागरंग’ या कार्यक्रमांतर्गत या मैफिलीत विविध मानाच्या मैफिली गाजवणारी युवा गायिका भाग्यश्री पांचाळेच्या शास्त्रीय गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. नाट्यप्रिय तरुणाईसाठी शनिवार रात्र ते रविवार पहाटेपर्यंत म्हणजेच संपूर्ण रात्रभर विविध स्पर्धांतून गाजलेल्या एकांकिकांचा महोत्सव नाट्यजागर आयोजित करण्यात आला. त्यालाही नाट्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी पहाटे ‘प्रात:स्वराचे रागरंग’मध्ये जलतरंग - मिलिंद तुळणकर आणि सनई - प्रमोद गायकवाड यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम रंगला. महोत्सवाची सांगता विद्यासागर अध्यापक लिखित-दिग्दर्शित डायबेटिक जीवनशैलीवरच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाने झाली. कला, साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य अशा सर्वच कार्यक्रम आणि कार्यशाळांना रसिकांनी दिलेला उदंड प्रतिसाद आणि महोत्सव यशस्वी होण्यासाठी त्यांचा असलेला पाठिंबा हेच या महोत्सवाचे यश असल्याची भावना महोत्सवाच्या समारोपप्रसंगी पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)