Join us

मुंबादेवीच्या पुनर्विकासात कोळी जमातीला स्थान द्या; राजहंस टपके यांची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: April 01, 2023 7:01 PM

मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करतांना यामध्ये कोळी जमातीचा हक्क देण्याची मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

मुंबई- मुंबईचे कुलदैवत असलेल्या श्री मुंबादेवी मंदिर आणि परिसराचा श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या देवीचे दर्शन घेताना नुकतीच केली. मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करतांना यामध्ये कोळी जमातीचा हक्क देण्याची मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

 मूळ कोळी जमातीच्या नैसर्गिक सागरी बेटांना सामावून तयार झालेली महानगरी आहे. ती येथील कोळी जमातीचे कुलदैवत असलेल्या मुंबादेवी मातेच्या नावावरून मुंबई नाव प्राप्त झाले आहे. काळाच्या ओघात परप्रांतीय विलख्यात मंदिर घुसमटले असून ते सध्या गैर कोळी समाजाकडे आहे. मुंबादेवीच्या पुनर्विकासात आणि मुंबादेवी व्यवस्थापनात  मुंबईचा मुळ नागरिक असलेल्या कोळी जमातीला सहभागी  केल्याशिवाय पुनर्विकास शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 श्री मुंबादेवी देवस्थानच्या विश्वस्तांच्या कथित कारभारा विषयी राज्याच्या विधानसभेत देखील जोरदारपणे चर्चा सुरू आहे.मागील अकरा वर्षापासून कोळी जमात आपल्या न्याय मागणी आणि मंदिरावरील हक्क शाबूत ठेवण्यासाठी दर वर्षी नवरात्र उत्सवामध्ये सामूहिक दर्शन घेऊन देवस्थान मुक्तीचे सविनय आंदोलन करत आहे.

 हे देवस्थान कोळी जमातीचे असून ते मूळ जमातीकडे मुख्यमंत्री महोदयांनी द्यावे अशी जोरदार मागणी कोळी समाजाने केली आहे. या अनुषंगाने मुंबईतील मूळ भूमिपुत्र असलेल्या कोळी जमातीला त्यांच्या अस्तित्व टिकविण्याबरोबर धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या कॅरिडोरमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी राजहंस टपके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.