Join us

उड्डाणपुलांखालील जागा होणार अतिक्रमणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:09 AM

वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी पालिकेने मुंबईत उड्डाणपूल बांधले. मात्र, या उड्डाणपुलांखाली गर्दुल्ले, समाजकंटकांनी बस्तान बांधले आहे. त्यामुळे ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उड्डाणपुलांखालील जागेचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.

मुंबई : वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी पालिकेने मुंबईत उड्डाणपूल बांधले. मात्र, या उड्डाणपुलांखाली गर्दुल्ले, समाजकंटकांनी बस्तान बांधले आहे. त्यामुळे ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उड्डाणपुलांखालील जागेचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात १५ उड्डाणपुलांखालील जागांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.उड्डाणपुलांखालील अतिक्रमण हटवण्यासाठी या मोकळ्या जागांवर जॉगिंग ट्रॅक, खुली व्यायमशाळा, विरंगुळा केंद्र, बालोद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले वाचनालय बांधावे, अशी मागणी नगरसेवकांकडून होत होती. याबाबतची ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेत मंजूर होऊन आयुक्त अजय मेहता यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली होती. त्यानुसार पालिकेने उड्डाणपुलांखालच्या जागेवर खुली व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक बांधण्याचे धोरण तयार केले आहे. याअंतर्गत २०१६-२०१७ मध्ये २१ उड्डाणपुलांखाली जागांचे सौंदर्यीकरण करण्यात आले. आता १५ उड्डाणपुलांखालील जागा सुशोभित करण्यात येणार आहे.