महाराष्ट्रातील किल्ल्यांना जगाच्या नकाशावर स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 06:10 AM2018-07-19T06:10:30+5:302018-07-19T06:10:51+5:30
युनेस्कोशी संलग्न असलेल्या ‘आयकोफोर्ट इंडिया’ संस्थेने राज्यातील गड-किल्ले जागतिक नकाशावर ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबई : युनेस्कोशी संलग्न असलेल्या ‘आयकोफोर्ट इंडिया’ संस्थेने राज्यातील गड-किल्ले जागतिक नकाशावर ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, ४ आॅगस्ट २०१८ रोजी ‘स्ट्राँगहोल्डस आॅफ वेस्टर्न इंडिया - फोर्ट्स आॅफ महाराष्ट्र’ हे जर्नल (विशेषांक) प्रकाशित होत आहे. जर्नलमध्ये अनेक इतिहास अभ्यासक, किल्ल्यांचे लष्करी स्थापत्य अभ्यासक आणिपुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे सचित्र लेख आहेत. हे जर्नल युनेस्कोमधील सदस्य देशांना, संलग्न संस्थांना पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले किल्ले हे जागतिक नकाशावर येणार आहेत.
युनेस्कोच्या वतीने निसर्ग आणि जैवविविधतेसाठी सह्याद्रीसह पश्चिम घाटांचा ‘जागतिक संरक्षक वारसा’मध्ये समावेश झाला आहे. याचदरम्यान राजस्थानातील पाच किल्ले हे जागतिक संरक्षित स्थळांमध्ये समाविष्ट झाले. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यास त्यांचा जागतिक संरक्षित वारशामध्ये समावेश होणे उपयुक्त ठरेल. हे लक्षात घेता साताºयातील अजिंक्यतारा येथे झालेल्या दुर्ग साहित्य संमेलनात २०१३ साली शुभम श्रोत्री यांनी संबंधित प्रस्ताव मांडला. त्याला संयुक्त राष्ट्र संघाचे माजी संचालक राजेंद्र शेंडे यांनी अनुमोदन दिले. त्यासंबंधी आपल्या संकेतस्थळावर लेख लिहिला.
२०१४-१५च्या दरम्यान पुण्यात यासंबंधी बैठकाही झाल्या. बैठकांना राजेंद्र शेंडे, त्यांचे तेर पॉलिसी सेंटर, प्रतापगड जीर्णोद्धार समिती आणि शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज राजगड यांचे सदस्य उपस्थित होते. छत्रपती संभाजी राजे यांना याची माहिती मिळताच त्यांनीही उपक्रमाला पाठिंबा दिला.
राजेंद्र शेंडे व संभाजी राजे यांनी यासंबंधी शिखा जैन यांच्याशी संपर्क साधला. जैन यांनी त्यांच्या महाराष्ट्रातल्या सहकारी अर्चना देशमुख-कुलकर्णी यांच्यासोबत काही किल्ल्यांची पाहणी केली. महाराष्ट्रातले किल्ले हे लष्करी स्थापत्याचे उत्कृष्ट नमुना आहेत, हे ओळखून युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचे, असे त्यांनी ठरवले. याच प्रयत्नांची फलश्रुती म्हणून २०१७ साली युनेस्कोशी संलग्न संस्थांचे प्रतिनिधी येऊन रायगड तसेच सिंहगडाची पाहणी करून गेले. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांवर स्वतंत्र जर्नल प्रकाशित करावे, असे सर्वानुमते ठरले.
४ आॅगस्टला जर्नलचे प्रकाशन पुणे येथे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते होईल. वर्षभरापूर्वी दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे निधन झाले. त्यामुळे जर्नल त्यांच्या कार्याला समर्पित करण्यात आले आहे.
>इतिहासालाही उजाळा
डॉक्टर शिखा जैन या युनेस्कोच्या तज्ज्ञ भारतीय स्थापत्यशास्त्राच्या तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्या ‘आयकोफोर्ट इंडिया’च्या संचालिका व द्रोणा या पुरातत्त्वीय सल्लागार संस्थेच्या अध्यक्षा आहेत. या संस्थेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अर्चना देशमुख-कुलकर्णी या करीत असून, हे जर्नल प्रकाशित होण्यामागे त्यांचे बहुमोल योगदान आहे. यामुळेच आता गड-किल्ल्यांच्या रूपातील भारताच्या इतिहासाला उजाळा मिळण्यासोबतच लष्करी स्थापत्याचे उत्कृष्ट नमुने सर्वदूर पोहोचणार आहेत.