Join us

पालिकेच्या आरोग्य सेविकांचे प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 5:19 AM

किमान वेतन कायदा, प्रसूती विषयक कायदा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरभाडे भत्ता कायदा, उपदान कायदा या प्रमुख प्रलंबित मागण्यांसाठी शहर-उपनगरातील पालिकेच्या २०२ आरोग्य केंद्रांमधील चार हजार आरोग्य सेविका सोमवारपासून बेमुदत संपावर आहेत.

मुंबई : किमान वेतन कायदा, प्रसूती विषयक कायदा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरभाडे भत्ता कायदा, उपदान कायदा या प्रमुख प्रलंबित मागण्यांसाठी शहर-उपनगरातील पालिकेच्या २०२ आरोग्य केंद्रांमधील चार हजार आरोग्य सेविका सोमवारपासून बेमुदत संपावर आहेत. सोमवारी त्या आझाद मैदानावर एकवटल्या होत्या. गेली २० वर्षे आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या कामबंद आंदोलनात शेकडो आरोग्य सेविका सहभागी झाल्या. या संघटनेच्या शिष्टमंडळाला सोमवारी दुपारी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी भेट देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ऐनवेळेस ही भेट रद्द झाल्याने संघटनेला अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आश्वासन देण्यात आले. मात्र, संघटनेच्या शिष्टमंडळाने ही भेट नाकारून पालिका आयुक्तांशीच चर्चा करण्याचा आग्रह धरला आहे.आंदोलनाविषयी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश देवदास यांनी सांगितले की, गेली २० वर्षे आरोग्य सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष करीत आहोत. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यातही संप केला होता, मात्र केवळ आश्वासनावरच बोळवण करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्याने पदरी निराशा पडली. आजही पालिका आयुक्तांची बैठक ऐनवेळेस रद्द झाली. त्यामुळे आमचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाआंदोलन