५४ विद्यार्थ्यांचा अवयवदानाचा संकल्प, झेविअर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:35 AM2017-09-09T03:35:18+5:302017-09-09T03:35:29+5:30
तरुण पिढीला अवयवदानाचे महत्त्व समजावे, त्यांच्यामध्ये अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी याकरिता झेविअर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन खासगी रुग्णालय आणि स्वयंसेवी संस्थांनी केले होते.
मुंबई : तरुण पिढीला अवयवदानाचे महत्त्व समजावे, त्यांच्यामध्ये अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी याकरिता झेविअर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन खासगी रुग्णालय आणि स्वयंसेवी संस्थांनी केले होते. या वेळी या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास ५४ विद्यार्थ्यांनी अवयवदानाचा संकल्प करत प्रतिज्ञा केली.
या प्रशिक्षण उपक्रमात ३00 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हृदयविकाराचा झटका आलेल्या एखाद्या रुग्णावर त्वरित उपचार सुरू करण्याच्या प्रक्रियेतील कार्डिओकल्मोनरी रिस्युसिटेशन (सीपीआर) या उपचार पद्धतीविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी या वेळी काही प्रात्यक्षिके करून दाखवली. या वेळी विद्यार्थ्यांना प्रथमोपचारांविषयीदेखील प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले.
अवयवदानाचे महत्त्व याविषयी खासगी रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण करणाºया टीमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दान करता येण्याजोगे अवयव नेमके कोणते, अवयवदानाविषयीचे गैरसमज, ब्रेनडेड म्हणजे काय आदी विषयांचा ऊहापोह या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी केला. विद्यार्थ्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. या उपक्रमाविषयी डॉ. बिपीन चेवाळे म्हणाले की, तरुणांना बेसिक लाइफ सपोर्टविषयी माहिती देऊन वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णाची कशी मदत करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. सेंट झेवियर्स पॉलिटिकल सायन्स असोसिएशनच्या विभागप्रमुख प्रतिभा नैथानी म्हणाल्या की, आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्याचे प्रशिक्षण तरुणाईला दिले.