गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करावे - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:00 PM2019-08-14T17:00:31+5:302019-08-14T17:00:56+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.
मुंबई : गणेशोत्सवाचे स्वरूप हे उत्साही राहिले पाहिजे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सार्वजनिक गणेशोत्सव काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सार्वजनिक उत्सव मंडळ आणि धर्मादाय संस्था, विश्वस्त मंडळाच्या नोंदणीसाठी अत्याधुनिक प्रणाली सुरू करण्यात येईल. पासपोर्टसाठी ज्या पद्धतीने आता सुटसुटीतपणे आणि सहजपणे अर्ज, नोंदणी करता येते,त्याच पद्धतीने ही प्रक्रिया असेल. ऑनलाईन प्रणाली असेल, त्यामुळे कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. गणेशोत्सव समन्वय समिती आणि गणेशोत्सव महासंघानी सूचविलेल्या सूचनांवर उचित निर्णय घेण्यात येईल.
पोलिसांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करावे. तसेच पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती भूमिका घ्यावी. गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी प्रयत्न करू,असेही फडणवीस यांनी सांगितले.
उत्सव काळात गणेशोत्सव मंडळांनी स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर द्यावा, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी यावेळी केली. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत रात्री दहा नंतर पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याची मागणी पुण्यातील मंडळांनी केली असल्याची माहिती भेगडे यांनी दिली. यावेळी दहिबावकर व साळगावकर यांनी गणेशमंडळाच्या वतीने विविध सूचना केल्या.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र दहीबावकर,कार्याध्यक्ष कुंदन आगासकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयंत साळगावकर, सरकार्यवाह संजय सरनौबत आदी उपस्थित होते.