लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी पाहता ती कोरोना प्रसाराची प्रमुख केंद्रे ठरू शकतात. येत्या काही दिवसांत १८ वर्षांवरील वयोगटाचे लसीकरण सुरू केल्यानंतर या गर्दीत कैकपटीने वाढ होणार आहे. त्याआधी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यवस्था तयार करावी, अशी मागणी राष्ट्राभिमानी समितीने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी वेगळी रांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी वेगळी केंद्रे तयार करावीत असे पर्याय या संस्थेने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सुचवले आहेत. लॉकडाऊनमुळे पालिकेच्या शाळा बंद आहेत. त्यांचा वापर लसीकरण केंद्र, कोरोना तपासणी केंद्र किंवा कोविड सेंटर म्हणून करता येऊ शकतो असेही पत्रात नमूद केल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पळ यांनी सांगितले.
...............................................