एअर इंडियाच्या वसाहती सहा महिन्यांत रिकाम्या करण्याचे नियोजन करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:04 AM2021-08-25T09:04:51+5:302021-08-25T09:05:00+5:30
निर्गुंतवणूक प्रक्रियेबाबत व्यवस्थापनाच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत कर्मचारी वसाहती रिकाम्या करण्याच्या सूचना हवाई वाहतूक मंत्रालयाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार नियोजन करण्याचे निर्देश व्यवस्थापनाने संबंधितांना दिले आहेत.
चालू वर्षअखेरीस एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा केंद्र सरकारला आहे. त्यामुळे खासगीकरणानंतर एअर इंडियाच्या अखत्यारितील कर्मचारी वसाहती ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने त्यासंबंधीच्या सूचना एअर इंडिया व्यवस्थापनाला केल्या आहेत. एअर इंडियाचे व्यवस्थापन नव्या मालकांच्या हाती गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वसाहती रिकाम्या कराव्या, असे अपेक्षित आहे. खासगीकरणानंतरचे सहा महिने किंवा वसाहतींचे निर्गुंतवणुकीकरण यापैकी जी प्रक्रिया आधी पूर्ण होईल, तोपर्यंत कर्मचारी त्यात राहू शकतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...एअर इंडिया जबाबदार राहणार नाही
n मात्र, संबंधित कर्मचारी घर सोडत नाहीत तोपर्यंत एचआरए किंवा घरभाडे मिळण्यास पात्र ठरणार नाही.
n किंबहुना खासगीकरणानंतर या वसाहतींची देखभाल वा दुरुस्तीसाठी एअर इंडिया जबाबदार राहणार नाही, असेही हवाई वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
n शिवाय वसाहती रिकाम्या करण्यासाठी ठोस नियोजन करण्याचे आदेशही
व्यवस्थापनाला दिले आहेत.