घाटकोपर, अंधेरी स्थानकांचा आराखडा ३० दिवसांत पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 05:59 AM2019-10-14T05:59:44+5:302019-10-14T06:00:12+5:30
गर्दीचे व्यवस्थापन करणार : रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने घाटकोपर आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने अंधेरी स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन करणारा आराखडा ३० दिवसांत पूर्ण केला आहे. यामध्ये दोन्ही स्थानकांवर पादचारी पूल वाढविण्यात येणार असून, मेट्रो स्थानकावरील स्टॉल हटविले जाणार आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
मेट्रो स्थानक आणि घाटकोपर रेल्वे स्थानक जोडल्यामुळे घाटकोपर स्थानकावर गर्दीचे प्रमाण वाढले आहे. यासह अंधेरी स्थानकावर मेट्रो, हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्ग एकमेकांना जोडले गेल्याने प्रवाशांचा ताण वाढला आहे. त्यामुळे या गर्दीचे नियोजन करून ३० दिवसांत यावर उपाययोजना शोधण्यात याव्यात, अशा सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी १३ सप्टेंबर रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. घाटकोपर स्थानकाचे सर्वेक्षण करून गर्दीच्या व्यवस्थापनासाठी येथे नवीन पादचारी पूल बनविण्याचा प्रस्ताव आहे. यासह मेट्रो स्थानकातील सुरक्षा विभाग, मेट्रोकडे जाण्यासाठी रांगा लावण्याची जागा वाढविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
अंधेरी स्थानकाची पाहणी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्याच्याद्वारे स्थानकाचे सर्वेक्षण केले. दोन पादचारी पुलांचे काम येथे केले जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवरील स्टॉल हटविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
घाटकोपर मेट्रो स्टेशनचे होणार स्थलांतर
घाटकोपर मेट्रो स्टेशनचे कार्यालय स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. घाटकोपर स्थानकावरील तिकीट कार्यालय हलविण्यात येईल आणि स्कायवॉकजवळ उभारण्यात येईल. नव्या तिकीट कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना वावरण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने सुरक्षा तपासणी केंद्र मेट्रो स्टेशनच्या आत घेण्याचे काम सुरू आहे. एएफसी (आॅटोमॅटिक फेअर कलेक्शन्स) गेटची जागा ५० मीटरने मेट्रोच्या दिशेने आत ढकलली आहे.
असे होणार काम
घाटकोपर मेट्रो स्टेशनचे कार्यालय स्थलांतर करण्याचे काम सुरू.
घाटकोपर स्थानकावरील तिकीट कार्यालय हलविण्यात येणार.
स्कायवॉकजवळ उभारणार नवे तिकीट कार्यालय. बांधकाम सुरू.
अंधेरी
अंधेरी स्थानकाचे झाले समितीद्वारे सर्वेक्षण.
फलाट क्रमांक ६, ७ वर लवकरच नवा पूल.
गर्दीच्या ठिकाणांवरील स्टॉल हटविण्यात येणार.
अंधेरीत उभारणार दोन पादचारी पूल
नवीन आरखड्यानुसार अंधेरी स्थानकात दोन पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. याच कामाचा एक भाग म्हणून फलाट क्रमांक ६, ७, ८, ९ यांना जोडणाºया तसेच पादचारी जिन्याचेही काम सुरू आहे. यासह फलाट क्रमांक ६, ७ वर लवकरच प्रवाशांचा सोयीसाठी नवा पूल उपलब्ध होणार आहे.