Join us

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक स्तरावर नियोजन करा; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 12:44 AM

कोरोनाची मुंबईतील स्थिती नियंत्रणात आली आहे.

मुंबई : दीपावलीच्या खरेदीसाठी नागरिक दुकाने, मंडया, मॉल्स यासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. परिणामी कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून गर्दीची ठिकाणे आणि वेळा शोधा. त्यानुसार गर्दीवरील नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात करा. उपाययोजनांमध्ये पोलिसांसमवेत बैठका घेऊन स्थानिक स्तरावर नियोजन करा. प्रबोधन करा, पालिकेचे संबंधित परिमंडळीय सहआयुक्त/उपआयुक्त, सर्व सहायक आयुक्त यांच्यावर मुख्यत्वे ही सर्व जबाबदारी आहे, असे सांगून सर्व सूचनांचे कसोशीने पालन करण्याच्या सूचना मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केल्या आहेत.

कोरोनाची मुंबईतील स्थिती नियंत्रणात आली आहे. असे असताना दीपावलीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसह विविध कारणांसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांनी या सूचना केल्या. दिवाळीत गर्दी नियंत्रित व्हावी यासह फटाक्यांसंबंधी परिपत्रकाची अंमलबजावणी याविषयी चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या या संयुक्त बैठकीत सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, सर्व सहआयुक्त व उपआयुक्त, पोलीस सहआयुक्त आदी उपस्थित हाेते.

नागरिकांचे सहकार्य अपेक्षित 

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळाले आहे. ही स्थिती बिघडणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या सण-उत्सवांमध्ये नागरिकांनी केंद्र व राज्य सरकारसह महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शक्यतो घरीच व साधेपणाने उत्सव साजरे केले. तेच सहकार्य दीपावलीमध्ये अपेक्षित आहे. - इक्बाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

टॅग्स :मुंबई महानगरपालिका