Join us

दरोड्याच्या तयारीत आलेल्या दिल्लीच्या टोळीचा डाव फसला; एलोरा गेस्ट हाऊसमधून शस्त्रांसह सहा जणांना अटक 

By मनीषा म्हात्रे | Published: January 07, 2024 5:22 PM

बोरिवली रेल्वे स्टेशन जवळील एलोरा गेस्ट हाऊसमधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : दरोड्याच्या तयारीत मुंबईत आलेल्या दिल्लीतील सहा जणांच्या टोळीला राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने अटक केली आहे. बोरिवली रेल्वे स्टेशन जवळील एलोरा गेस्ट हाऊसमधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून ३ पिस्टल आणि २९ काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, एलोरा गेस्ट हाऊसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परराज्यातील सहा जण राहण्यास असून त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकांनी रविवारी सापळा रचून सहा जण निघण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या झडतीत एक गावठी कट्टा, एक देशी बनावटीची पिस्टल, एक विदेशी बनावटीची पिस्टल, ४ मॅगझिन, २९ राउंडसह चाकू तसेच स्कॉर्पिओ व दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त करण्यात आलेले आहेत. कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत हत्येच्या गुन्हयात शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेला शहादत हुसेन उर्फ कल्लू रेहमत हुसेन (जामा मस्जिद),गाझियाबादमध्ये हत्या तसेच सोनसाखळी आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला असलम शब्बीरअली खान, दरोडेखोर नदीम युनूस अन्सारी (जामा मस्जिद), चोरीचे गुन्हे नोंद असलेला रिझवान अब्दुल लतीफ (उत्तर प्रदेश), यांच्यासह नौशाद अन्वर (उत्तरप्रदेश) आणि आदिल खान (उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.

या आरोपींमध्ये नौशाद हा मुंबईत रेकी करण्याच्या उद्देशाने मुंबईत आला होता. तर, आदिलही त्याच्या वाहनासह गुन्ह्यात सहभागी होण्यासाठी आला असल्याची माहिती तपासात समोर आली. आरोपींविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे दरोडा टाकण्याची तयारी करणे व त्यासाठी शस्त्र व इतर साहित्य बाळगणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :मुंबईअटकगुन्हेगारी