Join us

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे नियोजन करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 6:54 PM

एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे उर्वरित वेतनांचे आणि एप्रिल, मे महिन्याच्या वेतनासाठी आर्थिक नियोजन करावे.

 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे उर्वरित वेतनांचे आणि एप्रिल, मे महिन्याच्या वेतनासाठी आर्थिक नियोजन करावे,  अशी मागणी एसटीच्या  महाराष्ट्र स्ट्रेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. 

 एसटी महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मध्यवर्ती कार्यालय यांनी दिलेल्या सूचनेनुसार एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन एप्रिल महिन्यात १००%, ७५% व ५०%  प्रमाणे वेतन अदा करण्यात आले. हे वेतन  राज्य सरकारने  सवलत मूल्य पोटी  असलेल्या प्रतिपूर्ती पोटी १५०कोटी रुपये दिल्यानंतरच करण्यात आले. उर्वरित २५% व ५०% वेतनाबाबत अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली. 

 कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे काही एसटी कर्मचारी आपले कर्तव्य करीत आहेत.  देशातील एकही कामगार वेतनाशिवाय राहणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.  मार्च महिन्याचे वेतन एप्रिलमध्ये देताना अनेक अडचणी आल्या. एसटी महामंडळाकडून आर्थिक नियोजन न झाल्यामुळे वेतन विलंबाने झाले. त्यामुळे मार्च महिन्याचे उर्वरित वेतन आणि एप्रिल, मे महिन्याचे वेतन 7 तारखेला होईल,  यासाठी आर्थिक नियोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्ट्रेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.

टॅग्स :पैसाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस