राज्यातील सर्व विद्यापीठात दूरस्थ शिक्षण प्रणाली उभारण्याची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:06 AM2021-03-18T04:06:57+5:302021-03-18T04:06:57+5:30
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे सूतोवाच लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठातून यावर्षी १८,००० विद्यार्थ्यांनी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून पदवी ...
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे सूतोवाच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठातून यावर्षी १८,००० विद्यार्थ्यांनी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून पदवी प्राप्त केली. या दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाने निर्माण केलेला हा आदर्श महाराष्ट्रातील १३ विद्यापीठाने घ्यावा व ही दूरस्थ शिक्षण पद्धती महाराष्ट्रातील १३ विद्यापीठांत सुरू करण्यासाठी आग्रही आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पदवी वितरण समारंभात मांडले.
राज्याच्या १३ विद्यापीठात दूरस्थ शिक्षण प्रणाली राबविल्यास मुंबई विद्यापीठात दूरस्थ शिक्षण प्रणालीतून जर ६४ हजार विद्यार्थी शिकत असतील तर महाराष्ट्रात ७ ते ८ लाख विद्यार्थी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतील. यामुळे महाराष्ट्र उच्च शिक्षणात शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर असेल व महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती पदवीधारक असेल. म्हणून, मुंबई विद्यापीठाची दूरस्थ शिक्षण प्रणाली फक्त मुंबई विद्यापीठापुरती मर्यादित न राहता ती महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात राबवली जाईल. या पार्श्वभूमीवर त्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल व त्यामार्फत दूरस्थ शिक्षण प्रणाली महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात राबवली जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
महाराष्ट्रात प्रत्येक विद्यापीठात गुणवंत विद्यार्थी आहे, त्यांचा सत्कार शासनाच्या वतीने योजनेच्या माध्यमातून करण्यात येईल. या योजनेत दूरस्थ शिक्षण घेतलेले विद्यार्थीही असतील आणि यातून महाराष्ट्रातील गुणवत्ता दिसेल. ही योजना महाराष्ट्रातील १३ विद्यापीठांत राबवली जाईल. यातील जे ३ गुणवंत आपला लौकिक जगात करतील त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागरी सत्कारही केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. सोबतच विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ ही योजना म्हणजे एक चळवळ असून ती आर्थिक दुर्बल घटकापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या या पदवी वितरण समारंभात विविध शिक्षणक्रमातील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यावर्षी आयडॉलच्या १८ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली. विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनीदेखील आयडॉलमधून एम.ए. अभ्यासक्रमातून विद्यार्थी म्हणून पदवी प्राप्त केली होती. त्यांना सामंत यांच्या हस्ते पदवी देण्यात आली. या प्रसंगी पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे होते.
शाखानिहाय पदवी प्राप्त विद्यार्थी- संख्या
मानव विद्याशाखा- ४७००
वाणिज्य विद्याशाखा- १३००३
विज्ञान व तंत्रज्ञान- ३८८
कौशल्यविकास विद्याशाखा- २३०