Join us  

आराखड्याचा गोंधळ सुरूच

By admin | Published: January 10, 2016 3:34 AM

विकास आराखडा बनविताना झालेल्या असंख्य चुका आणि घोळ पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे उदभवला असून, याबाबतचा ठराव मंजूर होऊनही ९ पदे रिक्त असल्याने विकास आराखड्याचा

मुंबई : विकास आराखडा बनविताना झालेल्या असंख्य चुका आणि घोळ पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे उदभवला असून, याबाबतचा ठराव मंजूर होऊनही ९ पदे रिक्त असल्याने विकास आराखड्याचा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त कागदपत्रातून हे समोर आले आहे.माहिती अधिकार कार्यकर्त्याने प्रशासनाकडे विकास आराखड्यांतर्गत उपआयुक्त, नगररचनाकार, उपप्रमुख नगररचनाकार या पदाबाबत माहिती मागितली होती. पालिकेच्या उपप्रमुख रचनाकार (प्रभारी) विकास नियोजन कार्यालयाने कार्यकर्त्याला दिलेल्या माहितीनुसार, उपआयुक्त नगररचना कार्यालयाकरिता उपआयुक्त (नगररचना), प्रमुख नगररचनाकार (नियोजन), प्रमुख नगररचनाकार (स्टॅटेजिक प्लानिंग), उपप्रमुख नगररचनाकार (विकास नियोजन), उपप्रमुख नगररचनाकार (परिवहन योजना), प्रमुख नगररचनाकार (स्थानिक क्षेत्र योजना), प्रमुख नगररचनाकार (पर्यावरण), प्रमुख नगररचनाकार (स्थानिक आर्थिक विकास), प्रमुख नगररचनाकार (गृह आणि स्थावर मालमत्ता) ही पदे निर्माण करण्यात आली. या पदांना मंजुरीही देण्यात आली. परंतु या पदांवर नियुक्ती करण्यात आलेली नाही.पालिकेने उपप्रमुख नगररचनाकार कार्यालयात कार्यरत असलेल्या ६७ अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची माहिती दिली आहे. त्यापैकी २२ जणांची बदली झाली आहे किंवा त्यांना मूळ विभागात परत पाठविले आहे. म्हणजे ३३ टक्के कर्मचारी वर्गाची कमतरता आहे. दरम्यान, विकास आराखड्याकरिता शहर नियोजनकार या पदी दिनेश नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी २००९ साली बालचंद्रन रामकृष्णन यांचे नाव या पदासाठी आयुक्तांनी प्रस्तावले होते आणि बालचंद्रन यांनी प्रभारी प्रमुख अभियंत्यासह शहर नियोजनकार अशी दुहेरी भूमिका बजावली होती. (प्रतिनिधी)