मुंबई: मुंबईहून कोलकाताला रवाना होण्यासाठी रन-वेच्या दिशेने सज्ज होणाऱ्या विस्तारा कंपनीच्या विमानाला विमानतळ परिसरातील मालवाहू ट्रकने मंगळवारी संध्याकाळी धडक दिली. यावेळी विमानामध्ये १४० प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. मात्र, विमानाच्या एका इंजिनचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
विस्तारा कंपनीचे यूके-७७५ हे विमान मुंबई ते कोलकातासाठी रन-वेवर जाण्यासाठी निघाले होते. त्याचदरम्यान बाजूने जाणारा मालवाहू ट्रक अचानक येऊन विमानाच्या इंजिनजवळ धडकला. या धडकेमुळे विमानाला देखील जोरदार धक्का बसल्याने प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विमानतळावर ग्राउंड कर्मचाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे ही दुर्घटना झाल्याची माहिती आहे.
कोलकात्याला रवानाट्रक धडकेमुळे विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पडताळणी करण्याचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया विस्तारा कंपनीने दिली आहे. या घटनेनंतर विमानातील प्रवाशांना रात्री साडेआठच्या दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून कोलकातासाठी रवाना करण्यात आले.