मुंबई विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 06:05 AM2020-06-04T06:05:05+5:302020-06-04T06:05:15+5:30
वेगवान वारे व पावसामुळे विमान धावपट्टीवरून घसरले व दहा मीटर पुढे जाऊन थांबले
खलिल गिरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बंगळुरू येथून मुंबईला आलेले मालवाहू विमान धावपट्टीवर उतरताना बुधवारी दुपारी धावपट्टीवरून घसरले.
निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई व परिसरात वेगवान वारे वाहत असल्याने तसेच मुसळधार पाऊस पडत असल्याने विमान उतरवताना वैमानिकाला अडचण आल्याने हा प्रकार घडल्याचे समजते. सुदैवाने यात कोणताही अनर्थ घडला नाही.
वेगवान वारे व पावसामुळे विमान धावपट्टीवरून घसरले व दहा मीटर पुढे जाऊन थांबले. विमान १४/३२ या पर्यायी धावपट्टीवर उतरले. ते काही अंतर पुढे गेल्याने त्वरित मागे घेण्यात आले व धावपट्टी बंद करण्याची गरज भासली नाही. धावपट्टीचे नुकसान झोले नाही, असा दावा विमानतळ प्रशासनाने केला. दरम्यान, एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियासह चर्चा करून बुधवारी दुपारी अडीच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मुंबई विमानतळावरील सर्व हवाई वाहतूक रद्द केली होती.