ऐनवेळी विमानाचे तिकीट रद्द, त्यात परतावाही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:07 AM2021-05-25T04:07:01+5:302021-05-25T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विमान कंपनीने ऐनवेळी तिकीट रद्द केल्याने मुंबईत अडकून पडलेल्या बिहारच्या तरुणावर सध्या बिकट प्रसंग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विमान कंपनीने ऐनवेळी तिकीट रद्द केल्याने मुंबईत अडकून पडलेल्या बिहारच्या तरुणावर सध्या बिकट प्रसंग ओढवला आहे. पदरचे सगळे पैसे तिकिटाच्या रूपात अडकल्याने आता गावी कसे परतायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर आहे. आणखी ३० दिवस परतावा मिळणार नसल्याने पैशांची जमवाजमव करण्यासाठी त्याला नातेवाईक, मित्रांकडे याचना करावी लागत आहे.
आकाश राज असे या तरुणाचे नाव आहे. बहिणीला उपचाराकरिता टाटा रुग्णालयात भरती करण्यासाठी तो मुंबईत आला होता. परतताना त्याने हौसेखातर खिशातले सगळे पैसे खर्च करून विमानाचे तिकीट काढले. पण हवाई सफरीची हौस त्याला महागात पडली. काही अपरिहार्य कारणास्तव तिकीट रद्द करत असल्याचा संदेश विमान कंपनीने पाठविला आणि त्याच्या तोंडचे पाणीच पळाले. सात-आठ दिवसांत परतावा देण्याचे आश्वासन मिळाल्याने थोडा दिलासा मिळाला खरा, पण तो क्षणिक होता. कारण आठ दिवसानंतर त्याने कंपनीशी संपर्क साधल्यानंतर परतावा ३० दिवसांनीच मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
खिशात पैसे नसल्याने या मायानगरीत कसे दिवस काढायचे या विवंचनेत तो आहे. नातेवाईक, मित्रांना फोन करून पैसे पाठविण्याची याचना करीत आहे. रेल्वेने जाण्यापुरते पैसे जमा झालेत, पण आरक्षण मिळत नाही अशी अडचण आहे. त्यामुळे तत्काळ परतावा देण्यात यावा, यासाठी तो विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सोशल मीडियाद्वारे हवाई वाहतूक मंत्री, विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डाण संचालनालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती त्याने केली आहे.
दरम्यान, संबंधित विमान कंपनीशी याप्रकरणी संपर्क साधला असता त्यांच्या माध्यम प्रतिनिधींनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
............
नेमके काय घडले?
- ११ मे रोजी प्रवास करू शकत नसल्याने मी प्रवासाची तारीख बदलली. तारखेत बदल करता येणारे तिकीट मी चढ्या दराने खरेदी केले होते. परंतु, रिस्केड्यूल प्रवासाआधी काही तास गोएअरकडून तिकीट रद्द केल्याचा संदेश प्राप्त झाला.
- सात-आठ दिवसांत परतावा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, मुदत पूर्ण झाल्यानंतरही पैसे न मिळाल्याने पुन्हा पाठपुरावा केला. नव्या नियमानुसार ३० दिवसांनंतरच परतावा मिळेल, असा मेेसेज आल्याने तोंडचे पाणीच पळाले.
- खिशात पैसे नसताना इतके दिवस मुंबईत राहायचे कसे, हा प्रश्न आहे. त्यामुळे गोएअरने तत्काळ माझे पैसे परत करावे, अशी मागणी असल्याचे अक्षय राज याने लोकमतशी बोलताना सांगितले.