- मनोज गडनीसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विमानतळावर विमान वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असतानाच यासंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई विमानतळावरील विमानांच्या फेऱ्यांची संख्या कमी केली असली तरी अनेक विमाने मुंबईत त्यांच्या नियोजित वेळेअगोदर दाखल होत आहेत. अशा विमानांना जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत विमानतळाचे नियोजन कोलमडत असल्याने विमानांना विलंब होत आहे.
यामागची कारणे सांगताना एका हवाईतज्ज्ञाने सांगितले की, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यग्र विमानतळ अशी ओळख असलेल्या मुंबई विमानतळावरील धावपट्टी ही काटकोनात आहे. त्यामुळे एकावेळी एकच विमान उड्डाण करू शकते वा उतरू शकते. अशा स्थितीत विमानांचे नियोजन करणे हे वाहतूक नियंत्रण कक्षासाठी आव्हानात्मक आहे. देशात विमानतळांची जोडणी वाढल्यानंतर व विमान कंपन्यांतील स्पर्धांमुळे तिकीट दरांत स्पर्धा लागल्याने अनेक लोक विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी, विमान कंपन्यांनी आपल्या फेऱ्यांत वाढ केली आहे. मात्र, यामुळे विशेषतः मुंबई विमानतळावर वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. यावर तोडगा म्हणून विमान फेऱ्यांची संख्या अलीकडेच कमी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, विमानतळावरील विमानांची फेऱ्या कमी केल्यानंतर १६ ते २४ फेब्रुवारीदरम्यान ४३३७ विमाने मुंबईत दाखल झाली. यापैकी ५७० विमाने त्यांच्या नियोजित वेळेच्या आधी मुंबई विमानतळावर दाखल झाली. ही विमाने मुंबईनजीक आल्यानंतर त्यांनी उतरण्याची अनुमती मागितल्यावर त्यांना ती प्राधान्याने देण्यात आली. विमान उतरल्यानंतर त्यांना प्रवाशांना उतरविण्यासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून देणे, त्या जागी अन्य विमान असेल तर त्याची दुसरीकडे सोय करणे आदी अतिरिक्त ताण विमान वाहतूक कर्मचाऱ्यांवर पडत आहे. विमाने वेळेच्या आधी दाखल होत असल्यामुळे ज्या विमानांचे उड्डाण होणे अपेक्षित आहे त्यांनाही उड्डाणांना विलंब होत आहे. याखेरीज, मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणावर खाजगी विमानांचीदेखील आवक-जावक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनादेखील प्राधान्याने वेळापत्रकामध्ये सामावून घ्यावे लागते. परिणामी, विमान वाहतुकीमध्ये अधिक अडथळा निर्माण होताना दिसत आहे.