बीड : जगभरात ओमायक्रॉनची चिंता व्यक्त केली जात असतानाच पुण्यात रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच आता जिल्ह्यात सौदी, लंडन, अमेरिकेसह भारत भ्रमंती करून तब्बल १८ प्रवासी आले आहेत. त्यातील केवळ एकाचा शोध लागलेला नाही. शोधलेल्या १७ पैकी चौघांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे असे असले तरी विदेशातून उडालेले विमान मुंबईत उतरले आणि त्यातील प्रवासी बीडमध्ये स्थिरावल्याने बीडकर भयभीत झाले आहेत.
कोरोनाचे संकट कायम असतानाच तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि शासन याचे नियोजन करण्यात व्यस्त असतानाच आता ओमायक्रॉन या नव्या विषाणूने पुण्यात प्रवेश केला आहे. पुण्यात रुग्ण सापडल्याने राज्यातील सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे. विदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी करून होम क्वारंटाईन केले जात आहे. त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. असेच १८ प्रवासी विदेशातून जिल्ह्यात आले आहेत. सौदी अरब, इंग्लंड आणि अमेरिकेतून १० प्रवासी आले आहेत तर इतर ७ प्रवासी हे भारतातच फिरून आले आहेत; परंतु त्यांची विमानतळावर नोंद झाल्याने प्रशासनाला यादी प्राप्त झाली आहेत. त्यातील एका प्रवाशाचा अद्यापही शोध लागलेला नाही. आरोग्य विभाग व प्रशासन त्याच्याशी संपर्क करण्यासाठी धावपळ करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोठे आले हे प्रवासी?
जिल्ह्यात १८ पैकी १७ प्रवासी शोधले आहेत. त्यात माजलगाव तालुक्यात २, अंबाजोगाई ४, केज १ (मुंबईतच वास्तव्य) व इतर १० हे बीडमधील आहेत तसेच इंग्लंडहून ३ प्रवासी आले असून सौदी अरब ६ व अमेरिकेतून १ प्रवासी आला आहे. इतर ७ प्रवासी हे भारत भ्रमंती करून आले आहेत.
यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह-
आलेल्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्यात मुंबईतच राहिलेला परंतु केजचा पत्ता असलेला १, माजलगावचे २ व बीडमधील १ प्रवाशाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. अंबाजोगाईतील दाम्पत्याचा अद्यापही अहवाल प्राप्त झालेला नाही. या सर्वांना सध्या होम क्वारंटाईन केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
आतापर्यंत विदेशातून आलेल्या १८ प्रवाशांची यादी मिळाली आहे. त्यातील १७ जणांचा शोध लागला असून एकाशी संपर्क साधणे सुरू आहे. शोधलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. यातील चौघांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या सर्वांनाच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.