Join us

प्रवासी वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाकाळात प्रवाशांची रोडावलेली संख्या, विमानोड्डाणात झालेली घट आणि निर्बंधांमुळे मुंबई विमानतळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाकाळात प्रवाशांची रोडावलेली संख्या, विमानोड्डाणात झालेली घट आणि निर्बंधांमुळे मुंबई विमानतळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. यावर मात करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असून, प्रवासी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली.

प्रवासी संख्या पूर्वपदावर येण्यासाठी नवीन मार्गांवर फेऱ्या सुरू करण्यासह सुरक्षात्मक उपाययोजनांत वाढ आणि अंतर नियमांचे कटाक्षाने पालन करण्याकडे भर दिला जात आहे. सध्या हवाई प्रवासाकडे द्वितीय श्रेणी शहरांतील प्रवाशांचा कल सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन बरेलीसाठी चार साप्ताहिक उड्डाणे सुरू केली आहेत. शिवाय अजमेर, पोरबंदर, तिरुपती, ग्वाल्हेर आणि विशाखापट्टणमकरिता आठवड्याची १८ उड्डाणे पूर्ववत करण्यात आली आहेत. तसेच दरभंगा, आदमपूर आणि कलबुर्गी यांसारख्या नवीन मार्गांवर सेवा सुरू केली असून, दोहा, फ्रान्स आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील सेवाही पूर्ववत करण्यात आली आहे.

सध्या मुंबई विमानतळावरून ६३ देशांतर्गत आणि २६ आंतरराष्ट्रीय मार्गांवर सेवा दिली जात आहे. चालू वर्षात जवळपास ८.४ दशलक्ष प्रवासी हाताळले. या कालावधीत ७७ हजार ५०० विमानांनी सेवा दिली. दोहा हे प्रवाशांचे सर्वात पसंतीचे ठिकाण ठरले. देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना मे ते जुलै २०२१ दरम्यान मुंबई विमानतळावरून तब्बल ५२ हजार ५०० प्रवाशांनी दोहाकरिता उड्डाण घेतले. त्याव्यतिरिक्त न्यूयॉर्क ३१ हजार आणि दुबईला २५ हजार प्रवाशांनी प्रवास केला.

देशांतर्गत मार्गांचा विचार करता दिल्लीला सर्वाधिक प्रतिसाद दिसून आला. मे ते जुलैदरम्यान ३ लाख ३७ हजार ५०० प्रवाशांनी मुंबई-दिल्ली प्रवास केला, तर बंगळुरू १ लाख ४४ हजार ३५० आणि हैदराबादला मुंबईहून १ लाख २५ हजार जणांनी ये-जा केली. आमच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे फळ असल्याची माहिती मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.

.........

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी...

कोरोनाकाळात सुरक्षेला प्राधान्य देऊन भ्रमंतीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन विमानतळावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यादृष्टीने स्पर्शविरहित सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केल्याची माहिती विमानतळाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.