Join us

नियोजन : एमपीएससी परीक्षेला ६-९ संधीचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:08 AM

विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिसादलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एमपीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आता परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित ...

विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एमपीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आता परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा, तर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, काहींनी तर निर्णय योग्य असला तरी वेळ राखून निर्णयाची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

राज्यात सगळ्याच जिल्ह्यात लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे बहुसंख्य उमेदवार असले तरी, मुंबई-पुण्यात ही संख्या जास्त आहे. उमेदवार मुंबई-पुण्यात राहायला येऊन, नोकरी करून या परीक्षा देत असतात. उमेदवारांमधून सध्या तरी संमिश्र मतांचा सूर उमटत असून एकीकडे किमान संधीमुळे अशा विद्यार्थ्यांवर आता दबाव येणार असल्याची भावना व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम असतानाच हा मराठा उमेदवारांवर अन्यायकारक निर्णय लादला गेल्याची भावना मराठा संघटना तसेच विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया १

सलग आठ ते दहा वर्षे उमेदवार स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूनही यशाच्या प्रतीक्षेत असतात. परंतु, आतापर्यंत परीक्षेच्या संधीची मर्यादा नव्हती. त्यामुळे उमेदवारांना कितीदाही परीक्षा देता येत होती, परंतु या निर्णयामुळे उमेदवारांवर परीक्षेच्या संधीबद्दल मर्यादा आल्या आहेत. हा निर्णय मागे घेऊन परीक्षेच्या अमर्याद संधी ठेवाव्यात.

- प्रथमेश शिंदे, उमेदवार

.....

संधीमुळे पार्टटाइम नोकरी करून एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना मोजक्याच संधीत तयारी करावी लागेल. आधी भरपूर संधी असल्यामुळे त्यांच्यावर दबाव राहत नव्हता. परंतु आता जसजशा संधी कमी होतील तसा त्यांच्यावर दबाव वाढणार आहे. याशिवाय सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि पेपरला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास ती संधी समजू नये.

- राजेश दाभाडे, उमेदवार

......

ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत, देत आहेत त्यांच्या संधी कशा ग्राह्य धरल्या जाणार हे आयोगाने स्पष्ट केले नाही. परीक्षा प्रक्रियेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अचानक आलेला हा निर्णय चिंतेचे वातारण निर्माण करणारा आहे.

- अमोल वाडेकर

आयोगाला अजूनपर्यंत सर्व सदस्य नाहीत, पूर्ण वेळ अध्यक्षदेखील नाही. मग इतकी तत्परता कशासाठी? यापेक्षा दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा वेळेत घेणे, निकाल वेळेत लावणे व या सर्व प्रक्रियेत अचूकता आणून विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी केला असता आणि मग निर्णय घेतला असता तर या निर्णयाचे मनापासून स्वागत करता आले असते.

- एमपीएससी समन्वय समिती

..... .....

(ही चौकट बदलू नये )

अशा प्रकारे होईल संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी