कोकणाच्या विकासासाठी नियोजन प्राधिकरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील बैठकीत घाेषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 07:24 AM2022-12-17T07:24:12+5:302022-12-17T07:24:26+5:30
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घाेषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रत्नागिरी येथे केली.
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. त्यानंतर ते बोलत होते. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणावर राहिलेला आहे आणि तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण करेल, असे ते म्हणाले.
बैठकीला उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, बंदर विकासमंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, तसेच आमदार, माजी आमदार, खासदार, आदींसह प्रमुख पदाधिकारी आणि जिल्ह्यातील खातेप्रमुखांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत प्रयत्न केले जातील. मत्स्य व्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय पॉलिसीबाबत अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
जागतिक स्तरावर येणारे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कृषी विभागातर्फे विशेष पोस्टर तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.