नियोजन : लसींचा स्टॉक नसल्याने केंद्रे बंद; १ मे पासून काय होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:06 AM2021-04-28T04:06:58+5:302021-04-28T04:06:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जाणार आहे. सध्याच्या स्थितीत स्टॉक नसल्याने अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जाणार आहे. सध्याच्या स्थितीत स्टॉक नसल्याने अनेक केंद्र बंद असताना १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस कशी मिळणार हा प्रश्न महापालिकेने सोडविला आहे. या दिशेने काम देखील सुरु झाले आहे. तर दुसरीकडे कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते आहे. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेऊन दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.
मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे. मुंबईत लसीकरणासाठी पात्र नागरिकांची संख्या सुमारे ४० लाख आहे. आतापर्यंत १० लाखापेक्षा अधिक मुंबईकरांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यातही बीकेसी कोविड केंद्रातील लसीकरण केंद्र हे आजमितीस देशात सर्वाधिक लसीकरण करणारे केंद्र आहे. मुंबईतील सध्याची दैनंदिन कोविड लसीकरण क्षमता सुमारे ४५ हजार इतकी असून ती दररोज १ लाखांवर नेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकत्रित प्रयत्नातून लसीकरणाची संख्या वाढेल. लसीकरणाचा वेग वाढला तर संसर्ग निश्चितच आटोक्यात येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
------------------
१८ वर्ष - नागरिकांची संख्या सुमारे ९० लाख
कोविड प्रतिबंध लसीकरण मोहिमेत पुढचा टप्पा म्हणून १८ वर्ष व अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण १ मे पासून करण्यात येणार आहे. मुंबईत या वयोगटातील नागरिकांची संख्या सुमारे ९० लाख इतकी आहे. या पार्श्वभूमीवर, लसीकरणासाठी पुरेशी शीतसाखळी, जागा व मनुष्यबळ आदी निकषांची पूर्तता करीत असलेल्या खासगी वैद्यकीय केंद्रांनी लसीकरण केंद्र नोंदणीसाठी अर्ज करावेत.
------------------
लसीकरण केंद्रांकडे हे हवे
१. प्रत्येक लसीकरण केंद्रात लस साठवणुकीसाठी पुरेशी शीतसाखळी उपकरणे असणे आवश्यक आहे.
२. लसीकरण केंद्रात लाभार्थ्यांसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.
३. लसीकरणासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे.
४. लसीकरणामुळे प्रतिकूल घटना घडल्यास त्यावर योग्य उपचारांची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
------------------
अडथळे आणि उपाय
१६ जानेवारी : पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे लसीकरण
१ फेब्रुवारी : पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण
१ मार्च : ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षे पूर्ण होण्यासह सहव्याधी असलेले नागरिक यांचे लसीकरण
१० आणि ११ एप्रिल : ७१ खासगी रुग्णालयात लसीकरण थांबले
९ एप्रिल : ९९ हजार लसी उपलब्ध
१० एप्रिल : १ लाख ३४ हजार ९७० लसी उपलब्ध
१२ एप्रिल : ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयात लसीकरण पुन्हा सुरू
१२ एप्रिल : ७१ पैकी ६२ खासगी लसीकरण केंद्र कार्यान्वित
२५ एप्रिल : १ लाख ५८ हजार मात्रा प्राप्त
------------------
१६ जानेवारीपासून काय झाले ?
- १० लाख ८ हजार ३२३ इतक्या लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या.
- सर्वाधिक म्हणजे ७०.१६ टक्के अर्थात ७ लाख ७ हजार ४७४ मात्रा महानगरपालिकेच्या २८ लसीकरण केंद्रांद्वारे देण्यात आल्या.
- उर्वरित २९.८४ टक्के लसीकरण हे राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारितील १२ लसीकरण केंद्रांद्वारे, १०६ खासगी लसीकरण केंद्रांद्वारे करण्यात आले.
------------------
महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ५९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित
खासगी रुग्णालयात ७३ लसीकरण केंद्रे कार्यान्वित
एकूण १३२ लसीकरण केंद्रे कार्यान्वित
लसीकरणासाठी पात्र नागरिकांची संख्या सुमारे ४० लाख
आतापर्यंत १० लाखापेक्षा अधिक मुंबईकरांचे लसीकरण
लसीकरण क्षमता सुमारे ४५ हजार
प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण
लसीकरण क्षमता दररोज १ लाखांवर नेण्यासाठी प्रयत्न सुरु
------------------