लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) अखत्यारित येणाऱ्या इंजिनिअरिंग व फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा तसेच अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमातील नियमित, बॅकलॉग विद्यार्थ्यांची हिवाळी प्रात्यक्षिक परीक्षा, थिअरी परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, नुकतीच प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर पुढील महिन्यातील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या हातात अवघे दोन महिने उरले आहेत. या दोन महिन्यांत अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार? अभ्यास कसा करणार? असे अनेक प्रश्न पालक व विद्यार्थी उपस्थित करत आहेत.
मंडळाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार डिप्लोमाच्या थिअरी परीक्षा दिनांक २ ते २३ मार्च, प्रथम सत्र आणि थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा थिअरी परीक्षा दिनांक २४ ते ३० मार्च, नॉन-एआयसीटीई अभ्यासक्रमांची थेअरी परीक्षा दिनांक २ ते १२ मार्च दरम्यान होणार आहे.
कोरोना काळात विद्यार्थांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. परंतु, दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक व फार्मसी डिप्लोमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना काही विषय हे प्रात्यक्षिक स्वरुपाचे असल्याने अशाप्रकारच्या अभ्यासक्रमाच्या तासिका मात्र ऑनलाईन होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारचा प्रात्यक्षिक अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासोबतच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करण्याचे आव्हान प्राध्यापकांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे प्राध्यापकांना कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ५० टक्के वाढीव तासिका घ्याव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाला अभ्यासक्रमातही काही प्रमाणात कपात करावी लागणार आहे. त्यासाठी मंडळाची तयारी असली, तरी कोणता अभ्यासक्रम किती प्रमाणात कमी होणार, याविषयी अद्याप कोणतीही स्प्ष्टता नसल्याने विद्यार्थी व प्राध्यापकांसमोर परीक्षेची तयारी पूर्ण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
.....
कोट -
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू असताना अनेक विषयांमधील क्लिष्ट संकल्पना स्पष्ट होऊ शकलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक विषयांचे वर्गही होऊ शकले नाहीत. त्यामुळे उर्वरित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेची तयारी करताना कसरत करावी लागणार आहे.
- हर्ष बडवे, पॉलिटेक्निक विद्यार्थी
ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत; पण त्यात विशेष असे काही कळत नाही. घरी अभ्यासदेखील पुरेसा होत नाही. अशात दोन महिन्यानंतर परीक्षेला सामोरे कसे जाणार, परीक्षेसाठी आणखी वेळ मिळायला हवा.
- अविनाश खैरनार, पॉलिटेक्निक विद्यार्थी
.....
गेल्या काही दिवसांपासून निश्चितपणे ऑनलाईन क्लासेस होत आहेत; पण ज्याप्रमाणे महाविद्यालयात शिकवले जाते आणि कळते, तसे ऑनलाईन क्लासमध्ये होत नाही. अभ्यासाकरिता पुरेसा वेळ मिळायला हवा, तेव्हाच परीक्षा व्हावी.
- पूजा विचारे, फार्मसी विद्यार्थिनी
....
ऑनलाईन अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक झालेले नाही. त्यामुळे परीक्षा देण्यात निश्चितच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विशेषत: प्रात्यक्षिक परीक्षांची तयारी परीक्षेपूर्वी होणे आवश्यक असून, त्यासाठी महाविद्यालयांनी अधिक तासिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
- तेजश्री यादव, फार्मसी डिप्लोमा विद्यार्थिनी