नियोजन - सहव्याधींमुळे कोरोनाचे सर्वाधिक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:31+5:302021-06-21T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक संसर्ग झाला, तर दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांसह तरुणाईही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक संसर्ग झाला, तर दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांसह तरुणाईही बाधित झाल्याचे दिसून आले. मात्र कोरोना काळात सर्वाधिक मृत्यू हे सहव्याधी असणाऱ्यांचे गेल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या माहितीतून उघड झाले आहे.
मुंबईत ६० ते ६९ वयोगटात सर्वाधिक मृत्यू झाले असून ही संख्या ४ हजार २३६ इतकी आहे, या वयोगटात रुग्णसंख्या ८५ हजार ७९ इतकी आहे. त्याखालोखाल ७० – ७९ वयोगटातील ३ हजार ६०९ रुग्णांचा मृत्यू ओढवला असून रुग्णसंख्या ४६ हजार ५९४ इतकी आहे. ५० ते ५९ वयोगटातील ३ हजार २४८ मृत्यूंची नोंद आहे, या वयोगटात आतापर्यंत १ लाख १९ हजार ८७४ जण कोरोनानेबाधित झाले आहेत.
मुंबईतील कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंविषयी राज्य कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उशिरा रुग्णालयात दाखल करणे, सहव्याधी असणे, खाटांची उपलब्धता नसणे या कारणांमुळे अधिक मृत्यू ओढवले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर, टास्क फोर्सने रुग्णांची कॅटेगरी ठरवावी. रिस्क प्रोफोईल समजून घेऊन रुग्णांना कोव्हिड-१९ किंवा कोव्हिड-१९ हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे याबाबत निर्णय घ्यावा. हाय रिस्क रुग्णांनी कोणत्या रुग्णालयात जावं, त्यांच्यासाठी बेड कोणता याबाबत सेंट्रल हॉटलाईनच्या मदतीने व्यवस्था करावी. जेणेकरून रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरणार नाहीत, अशा तरतुदी केल्या होत्या. त्याचप्रमाणे आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका व राज्य शासनाकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत.
चौकट
वयोगट मृत्यू
नवजात बालक ते ९ १८
१० ते १९ ४०
२० ते २९ १६४
३० ते ३९ ५२९
४० ते ४९ १४४७
५० ते ५९ ३२४८
६० ते ६९ ४२३६
७० ते ७९ ३६०९
८० ते ८९ १७४५
९० हून अधिक २४३
एकूण कोरोनाबाधित ७१९९४१
एकूण मृत्यू १५२६६
मृत्यू दर २.१२ टक्के
९५१ रुग्ण गंभीर अवस्थेत
मुंबईत १४ हजार ८६० रुग्ण उपचाराधीन आहेत. यापैकी ९५१ रुग्ण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात ४ हजार ४८७ लक्षणे असलेले रुग्ण आहेत, तर ९ हजार ४२२ लक्षणेविरहित रुग्ण आहेत.