ऑक्सिजनपुरवठ्यासाठी पालिकेने केले नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:49 AM2021-04-24T01:49:08+5:302021-04-24T01:49:14+5:30
महापालिकेला दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, तर आणखी पाचशे टन अन्य राज्यातून येणार आहे. मात्र पुन्हा कोणत्या रुग्णालयात तुटवडा झाल्यास ऑक्सिजन पुरवण्यासाठी पालिका प्रशासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दैनंदिन गरजेपेक्षा अधिक आवश्यक असलेला ऑक्सिजन साठा मुंबईला अद्यापही उपलब्ध झालेला नाही. यामुळे काही पालिका आणि खासगी रुग्णालयांत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यामुळे सर्व संबंधित रुग्णालयांनी त्यांच्याकडे दाखल रुग्णांच्या संख्येप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच कोणत्याही रुग्णालयात तुटवडा जाणवल्यास तत्काळ ऑक्सिजन पुरवठ्याबाबत ॲक्शन प्लॅन (कार्यपद्धती) पालिकेेने तयार केला आहे.
महापालिकेला दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, तर आणखी पाचशे टन अन्य राज्यातून येणार आहे. मात्र पुन्हा कोणत्या रुग्णालयात तुटवडा झाल्यास ऑक्सिजन पुरवण्यासाठी पालिका प्रशासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे.
त्यानुसार उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, कार्यकारी अभियंता संजय शिंदे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास राठोड हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ही कार्यपद्धती सर्व विभागीय कार्यालये, आरोग्य विभाग, सर्व रुग्णालयांनी अमलात आणण्याचे सक्त निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. हे सर्व केल्यानंतर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊ शकेल.
अशी आहे कार्यपद्धती
प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांच्या कार्यालयात डेटा शीट तयार करून, त्यामध्ये विभागनिहाय सर्व खासगी रुग्णालयांची माहिती द्यावी. या तक्त्यामध्ये सर्व प्रकारच्या कोविड रुग्णालयांची नावे व ऑक्सिजन पुरवठादाराचे नाव, त्या रुग्णालयामध्ये किती ड्यूरा, जम्बो आणि छोटे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत, याबद्दलची माहिती समाविष्ट करण्यात येईल. ही माहिती विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्यात येईल.
ऑक्सिजनपुरवठ्यासाठी केल्या उपाययोजना
nरुग्णालयाने ऑक्सिजन मागणी पुरवठादाराकडे किमान २४ तास किंवा त्यांच्या करारनाम्याप्रमाणे, यातील जो कालावधी जवळ असेल त्याआधी करावी. १६ तासांमध्ये हा पुरवठा उपलब्ध न झाल्यास रुग्णालय याबाबत विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळवतील.
nनियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क करून ऑक्सिजन पुरवठा वेळेवर होईल, याची खातरजमा करतील. दोन तासांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास, एफडीए नियंत्रण कक्षाला कळवतील.