सुरक्षित मुंबईसाठी नियोजन करणार: अमोल कीर्तिकर
By मनोहर कुंभेजकर | Published: May 9, 2024 06:09 PM2024-05-09T18:09:22+5:302024-05-09T18:10:28+5:30
कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ अंधेरी पश्चिम आणि गोरेगाव येथे प्रचाराफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
मनोहर कुंभेजकर, मुंबई: माझे शहर कसे असावे ? चांगल्याला प्रेरणा देणारे, विकासाला चालना देणारे, दूरदृष्टी ठेवून अविरत काम करणारे, जात पात धर्म एकोप्याचा संदेश देणारे, माझे शहर अभिमान बाळगणारे असावे. माझ्या लोकांचे जीवन पुढील २५ वर्षे, सुरक्षित व आरामदायी असावे याचे नियोजन करून काम करणारा माझा पक्ष शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हा आहे असे ठाम प्रतिपादन उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासियांना दिलेल्या संविधानाची पायमल्ली करत केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन, प्रसंगी आमिष दाखवून विरोधी राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना वेठीस धरुन पक्षांतर करण्यास भाजप कडून भाग पाडले जात आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी कुटील कारस्थाने रचली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोठे उद्योगधंदे इतर राज्यांना खुश करण्यासाठी स्थलांतरीत केले जात आहेत, परिणामी महाराष्ट्रात रोजगाराची साधने कमी झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करुन भाजप कडून वैमनस्याला खतपाणी घातले जात आहे. धर्माच्या नावाने डांगोरा पिटण्यापेक्षा ‘हृदयात राम आणि प्रत्येक हाताला काम’ या विचाराने उद्धव सेना काम करीत असून यापुढे काम करत राहणार असल्याचे मनोगत कीर्तिकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ अंधेरी पश्चिम आणि गोरेगाव येथे प्रचाराफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य जनता मोठया प्रमाणात सहभागी झाली होती.