लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोषण अभियानांतर्गत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने २०१९ मध्ये अंगणवाडीसेविकांना मोबाइल फोन दिले होते. मात्र आता अंगणावाडीसेविकांनी ते मोबाइल परत करण्याचे आंदोलन राज्यभर पुकारले आहे. गेल्या दोन वर्षांत सेविकांचे काम वाढत गेले. मात्र मोबाइलची क्षमता कमी पडत केली. त्यातच दुरुस्तीचा खर्च परवडत नाही, मोबाइलपेक्षा आमची नोंदवहीच बरी असा पवित्र त्यांनी घेतला आहे.
या मोबाइलमध्ये लाभार्थी यादी, वजन, हजेरी, उंची, स्तनदा माता, गर्भवती महिलांची माहिती, पोषण आहाराचे वाटप इत्यादी माहिती नोंद केली जात होती. मात्र, आता या मोबाइलचा कालावधी संपल्याने अशावेळी मोबाइल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडीसेविकांकडून वसूल केला जात आहे. बऱ्याच भागांत तर या मोबाइलवर इंटरनेटही व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.
मोबाइल अवघ्या दोन जीबी रॅमचा आहे. त्या तुलनेत लाभार्थींची भरायची माहिती खूप जास्त आहे. यामुळे मोबाइल हँग होतात, मोबाइलवर दुरुस्तीसाठी तीन हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अंगणवाडीसेविकांकडून घेतला जात आहे.
केंद्र सरकारने अंगणवाडीसेविकांना पोषण ट्रॅकर ॲप दिले आहे. मात्र, केंद्र सरकारचे हे मोबाइलमध्ये डाऊनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना आपल्या खासगी मोबाइलमध्ये ॲप डाऊनलोड करावे लागत असून, रात्री १२ वाजेपर्यंत माहिती भरण्याचेच काम करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या निमंत्रक शुभ शमीम यांनी दिली. याआधी पोषण ट्रॅकसंदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत आता मोबाइलसाठी आम्ही पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत, असे ही त्यांनी म्हटले आहे.
कोट
सेविकांचे चांगल्या दर्जाचे मोबाइल शासनाने द्यावेत. सध्या पोषण ट्रॅकर ॲपवर मुलांचे, महिलांचे नाव इंग्रजी भाषेत असल्याने इंग्रजी भाषेत माहिती भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. म्हणूनच पोषण ट्रॅकर ॲप मराठीतून उपलब्ध केले जावे. - संगीता कांबळे (अंगणवाडीसेविका)
जिल्ह्यातील एकूण अंगणवाडी प्रकल्प- २५
जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या - अंदाजे १०,०००
अंगणवाडीसेविका- १०,०००
चौकट
कामांचा व्याप
मुलांच्या वजनाचे ग्राफिक रेकॉर्डिंग करणे. सहा वर्षांखालील मुलांसाठी मुलांचे कार्ड सांभाळणे, वैद्यकीय आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना भेट देणे, सर्व कुटुंबांचे, विशेषतः त्या कुटुंबातील माता आणि मुलांचे आपापल्या कार्यक्षेत्रातील वर्षातून एकदा सर्वेक्षण करणे, मुलांच्या अंगणवाडीत पूर्वऔपचारिक उपक्रमांचे आयोजन करणे, पूरक पोषण आहार आयोजित करणे, गर्भवती मातांसाठी स्थानिक पाककृती उपलब्ध करणे, मातांना आरोग्य आणि स्तनपान, अर्भक आणि आहार पद्धतींवर समुपदेशन प्रदान करणे.