लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्षाने सोमवारी विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि नीट या देश पातळीवरील प्रवेश परीक्षेतून सूट देणारे विधेयक पास केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना १२ वीच्या गुणांवर आधारित एमबीबीएस, बीडीएसमध्ये प्रवेश मिळणार आहे. यामुळे देशभरातील इतर राज्यांतील वैद्यकीय प्रवेशाबाबतचे वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातून ही या निर्णयावर तज्ज्ञांच्या विविध प्रक्रिया येत आहेत. बहुतांश ठिकाणी या निर्णयाला पाठिंबा दिला जात आहे तर अनेक ठिकाणी अयोग्य निर्णय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
नीट परीक्षेसंदर्भातील तामिळनाडू सरकारचा निर्णय हा वास्तववादी असल्याची प्रतिक्रिया डीपर संस्थेचे संस्थापक सचिव हरीश बुटले यांनी दिली. महाराष्ट्रात इयत्ता १० वी नंतर सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेतात. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेले किमान गुण मिळवताना विद्यार्थ्यांची दमछाक होते. याउलट ग्रामीण विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेसाठी व्यवस्थित मार्गदर्शन न मिळणे, उत्तम अभ्यास करण्यासाठी पुरेसे शैक्षणिक साहित्य उपलब्ध न होणे यामुळे ‘नीट’ची तयारी व्यवस्थित करता येत नाही. यामुळे साहजिकच सधन वर्गातील विद्यार्थी ही परीक्षा देण्यात पुढे असतात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहत असल्याचे चित्र या परीक्षेत पाहण्यास मिळते, अशी महिती त्यांनी दिली.
यासोबतच या परीक्षेचे केंद्रीकरण होऊन काही मोठ्या खासगी क्लासेसची चलती यात दिसून येते आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण बाजूला सारले जाऊन त्याचे मागील काही वर्षांतील महत्त्व नगण्य झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तामिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे निश्चितच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांएवढीच बरोबरीची संधी मिळणार असून यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थी काय म्हणतात?
नीट परीक्षेमुळे राज्यात नाही तर राज्याबाहेरील महाविद्यालयांत ही प्रवेशाची संधी आणि पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे नीट परीक्षा ही आवश्यकच आहे.
- श्रीकला राणे, विद्यार्थिनी
खरे तर बारावीच्या आधारावर वैद्यकीय प्रवेश हीच संकल्पना योग्य आहे. नीटसाठी कोचिंग क्लासेसचे अवाढव्य शुल्क सगळ्यांनाच परवडते असे नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक कुवत असूनही आर्थिक कुवत नसल्याने मागे राहतात.
शिवराज गिरकर, विद्यार्थी