नियोजन : मुंबईत दहावीच्या निकालाचे काम जवळपास ३० टक्केच पूर्ण ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:22+5:302021-06-30T04:06:22+5:30
सीमा महांगडे मुंबई शाळा मुख्याध्यापक व समित्यांनी तयार केलेले आणि प्रमाणित दहावीचे निकाल हे ५ जुलै रोजी नियोजित केंद्रांवर ...
सीमा महांगडे
मुंबई
शाळा मुख्याध्यापक व समित्यांनी तयार केलेले आणि प्रमाणित दहावीचे निकाल हे ५ जुलै रोजी नियोजित केंद्रांवर सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान जमा करण्याच्या सूचना विभागीय शिक्षण मंडळांनी शाळा मुख्याध्यापकांना मंगळवारी नव्याने दिल्या आहेत. यापूर्वी २ जुलैपर्यंत निकाल जमा करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना मंडळाकडून देण्यात आल्या होत्या. दरम्यान, मुंबईतील अनेक शाळांच्या निकालाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने शिक्षक व मुख्याध्यापक शिक्षण मंडळांकडे मुदतवाढ देण्याची मागणी करत आहेत.
मुंबई शहर व उपनगर मिळून मंगळवारपर्यंत २८ ते ३० टक्के शाळांनीच निकालाचे काम पूर्ण करून निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. इतर ७० टक्के शाळांचे निकालाचे काम सुरू आहे, काहींचे पूर्णही झाले आहे; मात्र अद्याप त्यांनी संकेतस्थळावर त्याची निश्चिती केलेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुंबई विभागाला निकालाचे काम योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षक मुख्याध्यापक करत आहेत.
यंदा दहावीला मुंबई जिल्ह्यातून एकूण ३ लाख ६१ हजार ८४८ विद्यार्थी बसले आहेत. मंगळवारपर्यंत १ लाख १ हजार ५२९ विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्ण करून निश्चित करण्यात आले होते. तर १ लाख २० हजार ३५७ विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती मिळाली आहे. १ लाख ३९ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्ण झाले आहे; मात्र अद्याप प्रणालीमध्ये ते निश्चित करण्यात आलेले नाही.
राज्य शिक्षण मंडळाने राज्यातील शाळांना अंतर्गत मूल्यमापनाची पद्धती जाहीर केल्यानंतर वेळापत्रक दिले, ज्यानुसार शाळांनी कोणत्या वेळेत गुण संकलित करावे, मुख्याध्यापक व समितीने कोणत्या वेळेत ते प्रमाणित करावे, विभागीय मंडळाकडे निकाल केव्हा सुपूर्द करावा, याचा तपशील होता. या सगळ्या प्रक्रियांनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून त्यावर कार्यवाही होणार असून निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे शाळांना निकाल तयार करण्यास उशीर झाल्यास त्यासाठी सर्वस्वी शाळा व मुख्याध्यापक जबाबदार राहणार असून त्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र मुंबईसारख्या ठिकाणी जिथे अद्याप शिक्षक, मुख्याध्यापकांना रेल्वे प्रवासाची मुभा न मिळाल्याने शाळेत पोहोचता येत नाहीये तिथे शिक्षण मंडळाकडून निकाल तयार करण्यासाठी मुदतवाढ देणे योग्य असल्याचे मत मुख्याध्यापक संघटनेकडून मांडण्यात येत आहे.
२३ जून रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पद्धतीचे गुण मंडळाने तयार केलेल्या प्रणालीमध्ये भरण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापकांना लिंक उपलब्ध करून देण्यात आली. मात्र राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक दहावीच्या १६ लाख विद्यार्थ्यांचे गुण भरण्याची कार्यवाही त्यावर करीत असल्याने त्याचा वेग फारच कमी असल्याच्या तक्रारी मुख्याध्यापक करत आहेत.
कोट
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता आणि विशेषतः मुंबई विभागातील शिक्षक, मुख्याध्यापकांच्या प्रवासाच्या अडचणी लक्षात घेता शिक्षण मंडळाने किमान १० दिवसांची मुदतवाढ निकाल जमा करण्यासाठी द्यावी, अशी मागणी आहे.
पांडुरंग केंगार, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना
---------
गुण संकलन अवघड प्रक्रिया
अंतर्गत मूल्यमापनासाठी अनेक विद्यार्थ्यांना संपर्क होणे आवश्यक आहे. मात्र अनेक विद्यार्थी अजूनही संपर्काबाहेर असल्याने गुण संकलनात अडचण होत आहे. अद्याप अनेकांचे रेखाकला प्रस्तावही सादर होणे बाकी आहे.
शिरीष कानेटकर, वर्गशिक्षक, दहावी
दहावीच्या निकालाचे काम घरून करणे अवघड आहे, त्यास्तवही आम्हाला शाळेतच जावे लागत आहे. मात्र शाळेत पोहोचण्यासाठीही आम्हाला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. त्यामुळे निकालासाठी जो एकूण वेळ द्यायला हवा तोही अपुरा पडत आहे. मुदतवाढ मिळाल्यास निकाल योग्य पद्धतीने तयार होऊ शकेल.
सुमित्रा जोशी, शिक्षिका, दहावी
---------