Join us

नियोजन : सहा महिन्यांपासून गॅस सबसिडीचा मेसेजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान मुंबईकरांच्या खिजगणतीतही नाही, अशी स्थिती आहे. सिलिंडर आल्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान मुंबईकरांच्या खिजगणतीतही नाही, अशी स्थिती आहे. सिलिंडर आल्यानंतर बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होत असते. काही वेळा एक-दोन सिलिंडरचे अनुदान एकत्रितपणे जमा होते. शिवाय, दरवेळी अनुदानाची बदलणारी आणि अगदीच तुजपुंज्या आकड्यामुळे नागरिकही त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. मे महिन्यापासून अनेक ग्राहकांना सबसिडी आल्याचा मेसेज आलेला नाही. विशेष म्हणजे सबसिडी आलेली नाही, त्याचा मेसेज आला नाही हेसुद्धा अनेकांच्या ध्यानीमनी नाही.

मुंबईत सिलिंडरसोबतच पाइप गॅसधारकांची संख्याही मोठी आहे. साधारण ३३ लाख ६९ हजार सिलिंडरधारक आहेत. तर, ७ लाख ७३ हजार ग्राहकांच्या घरी पाइपद्वारे गॅसपुरवठा केला जातो. पाइपद्वारे येणाऱ्या गॅसचे वापरानुसार दर महिन्याला बिल येते. त्यासाठी महानगर गॅसचे मीटरही घरोघरी आहेत. अशा ग्राहकांना अनुदानाचा विषय येत नाही. याशिवाय, मुंबईत वाणिज्यिक वापरासाठीच्या १ लाख ६६२ जोडण्या आहेत. या ग्राहकांना वाणिज्यिक दरानेच सिलिंडरची खरेदी करावी लागते. महानगर गॅसची पाइपलाइन आणि विविध कंपन्यांच्या १२९ गॅस वितरकांच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरातील लाखो घरांत एलपीजी पोहोचते.

सध्या मुंबईत ६९४ रुपये दराने सिलिंडर खरेदी करावा लागतो. तर, विना अनुदानित सिलिंडरची किंमत १२०० रुपये आहे. या वर्षी मार्च महिन्यात २०४ रुपये ३३ पैसे जमा झाल्याचे मेसेज संबंधित ग्राहकांना बँकेकडून आले. त्यानंतरच्या एप्रिल महिन्यात १३५ रुपये २९ पैसे एलपीजी सबसिडीच्या रुपात जमा झाल्याचे मेसेज ग्राहकांना आले. त्याच्या बरोबर एक वर्ष आधी म्हणजे मार्च २०१९ मध्ये १८० रुपयांचे अनुदान जमा झाले. तर, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये अनुक्रमे ३२ आणि ३७ रुपयांचे अनुदान जमा झाले होते.

काही महिन्यांची एकत्रितपणे मिळणारी अनुदानाची रक्कम, बदलता आकडा यामुळे अनुदानाचा माग ठेवणे शक्य होत नाही. शिवाय, रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसविताना बँकेत जमा होणारे ३२ किंवा ३७ रुपयांचे मेसेज अगदीच फुटकळ वाटतात. शंभर, दोनशे रुपयांचा मेसेजही इतर मेसेजच्या गर्दीत हरवून जातो. मेनंतर अनुदानाचा मेसेज आला नाही, हेही फारसे ध्यानात आले नसल्याची भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली. मात्र, दुर्बल घटकांना हे अनुदानही आधार देऊन जाते. त्यामुळे यात सातत्य ठेवले गेले पाहिजे, असेही नागरिकांनी सांगितले.

जिल्ह्यातील सिलिंडरधारक : 33,69,839

गॅस वितरक : 129

अनुदानित सिलिंडरची किंमत : 694

पाइप गॅसलाइनधारकांची संख्या : 7,73,001

४) विनाअनुदानित सिलिंडरची किंमत : 1280.5

५) मिळणारे अनुदान : 0

६) वाणिज्य सिलिंडरधारकांची संख्या : 1,00,662

७) पाइप गॅसलाइनधारकांची संख्या : 7,73,001

एप्रिल महिन्यात गॅस अनुदान खात्यावर जमा झाल्याचा शेवटचा मेसेज आला होता. एप्रिलनंतर मात्र अनुदान जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही, पण एप्रिलपर्यंत खात्यावर नियमित अनुदान खात्यावर जमा झालेले आहे. - प्रियांका चव्हाण, गृहिणी

सध्या तरी ऑनलाइन ऑफर

एकेकाळी एजन्सीमध्ये प्रत्यक्ष जाऊन सिलिंडरची नोंदणी करावी लागत असे. त्यानंतर टेलिफोन आणि मोबाइल नोंदणीची सोय झाली. त्यानुसार दोन-चार दिवसांत रोख रक्कम देऊन आलेले सिलिंडर घ्यायचे आणि रिकामे परत दिले जात. आता, ऑनलाइन बुकिंगची सोय आहे. ॲमेझॉनसारख्या ॲपमधून बुकिंग करतानाच पैसे भरता येतात. शिवाय, कॅशबॅकचेही लाभ घेता येतात.