नियोजन : नर्सरी, केजीची मुलं यंदाही ऑनलाईनच शिकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:06 AM2021-05-27T04:06:23+5:302021-05-27T04:06:23+5:30
मुलं विचारताहेत शाळा सुरू होऊन कधी होणार सवंगड्यांचं दर्शन; कोरोनाच्या भीतीने मात्र घरातूनच शिक्षण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
मुलं विचारताहेत शाळा सुरू होऊन कधी होणार सवंगड्यांचं दर्शन; कोरोनाच्या भीतीने मात्र घरातूनच शिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे मागील संपूर्ण वर्षात शैक्षणिक क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले आहे, ते न भरून निघण्यासारखे आहे. पहिली ते नववी आणि अकरावीच्या अनेक विदयार्थ्यांनी यंदाचा शाळेत न जाता घरून अभ्यास केला. मात्र, नर्सरी, केजीच्या ज्या मुलांनी शाळाच पाहिली नाही किंवा नुकताच अनुभव घ्यायला सुरुवात केली होती, त्यांची शाळाच आणि त्यानिमित्ताने त्यांचे उलगडणारे शैक्षणिक भावविश्वही कोरोनामुळे कुलूपबंद झाले आहे. पूर्व प्राथमिकचे शिक्षण घेणाऱ्या लहानग्या चिमुकल्यांना मागील वर्षीही शाळेचे आणि शिक्षकांचे दर्शन घडले नाही आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षातही ते होण्याच्या आशा धूसर होत असल्याने ती हिरमुसली आहेत. सोबतच पालक आणि या शाळांचे संस्थाचालकही यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत.
मुलांचे मागील वर्षीप्रमाणे नर्सरी, केजी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने का होईना झाले आहेत. आता नवीन शैक्षणिक वर्षात त्यांचा अभ्यासही सुरू होईल; पण यंदाही त्यांना मागील वर्षीप्रमाणेच ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे. प्रत्यक्षात मित्रांना भेटून, नवीन गोष्टी शिकता येणार नाहीत, तर घरातच आई-बाबांसोबत विविध उपक्रमांतून त्या शिकाव्या लागणार असल्याने त्यांच्यासह पालकही नाराज आहेत. त्यांना मुलांच्या शैक्षणिक भविष्याचीही चिंता सतावत आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थी, पालकांसह संस्थाचालकही अडचणीत सापडले आहेत. पुढील शैक्षणिक सत्रही कोरोना संकटात जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नर्सरी, केजीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता कमी आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला गती द्यावी म्हणजे संभाव्य धोके आपल्याला टाळता येऊ शकतील, अशा प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत.
मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम
वर्षभरापासून मुलांची शाळा नाही. त्यामुळे ते घरीच अडकून पडले आहेत. अनेक मुलांमध्ये चिडचिडेपणा, हट्टीपणा वाढला आहे, त्यामुळे जेवढ्या जास्त वेळ मुलांना वेळ देता येईल, तो देण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी मिळून रहा, त्यांच्यासोबत खेळा म्हणजे त्यांच्यातील हट्टीपणा कमी होईल. अधिकाधिक वेळ स्क्रिनसमोर बसू देऊ नका, जेवण करताना टीव्ही बघणे टाळा, जुन्या गोष्टी, विविध छंद जोपासण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
चौकट
२०१९- २० विद्यार्थिसंख्या
विभाग - ज्युनिअर केजी - सीनिअर केजी
मुंबई उपनगर - ४२५१८ - ४८३७५
मुंबई - ६०६१- ६३७९
-----
नर्सरी, के.जी.च्या शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप तरी शासन स्तरावर कोणतेही धोरण ठरले नाही. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही महिन्यांपर्यंत प्री-प्रायमरीच्या शाळा सुरू करणे धोक्याचे ठरू शकेल. या शाळा काही दिवस बंदच ठेवाव्या. त्यातच तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर कोरोना स्थिती बघून प्री-प्रायमरीच्या शाळा सुरू कराव्या.
श्रीधर माने, खासगी प्ले ग्रुप नर्सरी, संस्थाध्यक्ष
------
पालक प्रतिक्रिया
कोरोनामुळे मुले घराबाहेर खेळायलाही निघत नाहीत. शाळा तर दूरची गोष्ट आहे. शाळा बंद असल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, यामुळे त्यांना मोबाईलचे व्यसन लागत आहे. त्यांच्या डोळ्यांवर व आरोग्यावर परिणाम होण्याची भीती वाटते. मोबाईल गेम, ऑनलाईन अभ्यास यावर नियंत्रण ठेवूनही या गोष्टी कराव्या लागत असल्याचे वाईट वाटते.
आसावरी भांडबे, पालक
मुलांची काळजी आणि आरोग्य ही प्राथमिकता असल्याने त्यांना शाळा सुरू झाल्या तरी शाळांमध्ये पाठविण्यास भीतीच वाटणार आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी या वयात तरी प्रत्यक्ष शालेय शिक्षणाशिवाय पर्याय नसला तरी ऑनलाईन शिक्षण सध्या स्वीकारावे लागणार आहे.
सुभाष कौंती, पालक
कोरोना संकटामुळे मागील वर्षीसारखीच पुढील सत्रातही शाळा भरण्याची शक्यता नाहीच. आता तर मुले कंटाळली आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरू होते; मात्र शाळेत शिकण्याची मजा यामध्ये नक्कीच नाही. शिक्षक मन लावून शिकवीत असले तरी विद्यार्थी इकडे-तितकेडच बघतात. त्यामुळे शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी प्रथम लसीकरण करून कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याला प्राधान्य द्यावे.
निकिता रावराणे, पालक
-------
कोट
जवळपास १५ महिन्यांपासून अधिक काळ लहान मुले घरात बंदिस्त आहेत, त्यामुळे त्यांच्या शारीरिक विशेषतः मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवून त्यांना घरातील कामातही सहभागी करून घ्यावे, त्याचवेळी त्यांच्याकडून शारीरिक व्यायाम, त्यांच्या आवडीचे छंदही पूर्ण करून घ्यावेत. मुलं समजून घेत त्यांच्यासोबत संवाद कायम ठेवल्यास त्यांच्यात सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होईल.
श्रीकांत शिनगारे, समुपदेशक