सायबर पोलिसांचा हालचालींवर वॉच, ग़ैरवापर केल्यास कोठड़ीची हवा
बदनामीसाठी सोशल मीडियाचे शस्त्र
सायबर पोलिसांचा हालचालींवर वॉच, ग़ैरवापर केल्यास कोठडीची हवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बदनामी करून सूड उगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यात सर्वसामान्यांपासून पोलिसांनाही टार्गेट केल्याचे चित्र अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून पाहावयास मिळाले. त्यामुळे अशा वाढत्या गैरवापरावर आळा घालणे सायबर पोलिसांसाठी एक आव्हान बनले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन प्रकरणाच्या निमित्ताने राज्य सरकार, मुंबई पोलिसांना बदनामीसाठी ट्विटरवर दीड लाखांहून अधिक खाती सापडली आहेत. यातील ८० टक्के खात्याद्वारे खोटे, चुकीची, बदनामी करणारे साहित्य हेतुपुरस्सर पसरवले जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. एखाद्या ट्विटच्या लाइक्स, रिट्विट, पोस्ट, कमेंट्स वाढविण्यासाठी बॉट्स सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. सोशल नेटवर्कच्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेत हे फेरफार करून असे कृत्रिमरीत्या आकडा फुगवून बनावट प्रोफाईल तयार केले जातात. अशा सॉफ्टवेअरला बॉट्स असे म्हणतात. भारताबाहेरून जास्तीत जास्त याचा वापर केल्याची माहितीही समोर आली.
अशा प्रकारे अनेक ठग सोशल मीडियाचा ग़ैरवापर करताना दिसत आहेत. त्यात अश्लील संदेश, ईमेल्स तसेच एसएमएसचा भडिमार पडताना दिसत आहे. गेल्या ११ महिन्यात अश्लील संदेश, ईमेल्स तसेच एमएमएस पाठविल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दफ्तरी २१५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ७७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा २३९ होता.
.....
बनावट अकाउंट, आणि मॉर्फिंगचा आधार..
बदनामीसाठी बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून किंवा मॉर्फिंगद्वारे चुकीची माहिती तसेच बदनामी केल्याप्रकरणी २८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यापैकी ६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ६१ होता. त्यापैकी २३ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला. यात फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्रामचा सर्वाधिक वापर होताना दिसत आहे.
....
आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य...
आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू शकत नाहीत, या आविर्भावात गुन्हेगार असतो. मात्र सोशल मीडियासंबंधित वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे नोडल अधिकारी सायबर पोलिसांच्या संपर्कात असतात. त्यामुळे एखाद्याचा छडा लावणे शक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणीही सोशल मीडियाचा गैरवापर करू नये. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितले आहे.
.....
अश्लील संदेश, ईमेल्स पाठविल्याप्रकरणी दाखल गुन्हे
...
महिना गुन्हे उकल
जानेवारी : २६ / १६
फेब्रुवारी : १८/०८
मार्च : १५/१०
एप्रिल : ०८/०२
मे : ०५/००
जून : २५/०४
जुलै : १७/०२
ऑगस्ट : १९/०७
सप्टेंबर : ३२/११
ऑक्टोबर : ३३/०८
नोव्हेबर : १७/ ०९
.................................
एकूण : २१५ / ७७