Join us

पुनर्विकासाच्या नावाखाली दामोदर नाट्यगृह बंद करण्याचा घाट

By जयंत होवाळ | Published: January 18, 2024 8:22 PM

नाट्यगृहाचा  वाढीव एफएसआय नाट्यगृहासाठीच वापरला गेला पाहिजे,मनोरंजन मंडळाला  नाट्यगृहात जागा मिळायला हवी अशी मागणी मंडळाने पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.

मुंबई: दामोदर नाट्यगृहाचा  पुनर्विकास करण्याच्या नावाखाली दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय पडून त्या जागी बक्कळ पैसे मिळवून  देणारी  सीबीएसई शाळेची इमारत बांधली जाणार आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली ८०० खुर्च्यांचे नाट्यगृह  अप्रत्यक्षपणे बंद करण्यात येत आहे, असा आरोप सहकारी मनोरंजन मंडळाने केला आहे. दामोदर हॉल पाडून  त्या जागी वाढीव क्षमतेचे नाट्यगृह व्हायला हवे. नाट्यगृहाचा  वाढीव एफएसआय नाट्यगृहासाठीच वापरला गेला पाहिजे,मनोरंजन मंडळाला  नाट्यगृहात जागा मिळायला हवी अशी मागणी मंडळाने पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.

सोशल सर्व्हिस लीगने 'आम्ही हॉल तोडून शाळा बांधणार आहोत, त्यासाठी जागा खाली करा एवढेच आम्हाला सांगितले आहे. तोडण्यात येणारे  दामोदर नाट्यगृह कुठे आणि कधी होणार ,या वास्तूत असलेल्या सहकारी मनोरंजन मंडळासाठी जागा कधी आणि कुठे देणार , नाट्यगृह पाडल्यानंतर नाटके कुठे करायची , मंडळाच्या नाटकांच्या तालमी  कुठे करायच्या , याचे ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. उलट तात्काळ विज पाणी तोडून आम्हाला अंधारात टाकले आहे. आमचा पुनर्विकासाला विरोध नाही, परंतु त्या नावाखाली नाट्यगृह बंद केले जात आहे, त्यास आमचा आक्षेप आहे,  असे मंडळाने लोढा याना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सीबीएसई  शाळेसाठी विकास आराखड्यातील नाट्यगृहाच्या जागेवरील नाट्यगृहाचे आरक्षण हटवून शाळेचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मंजुरी मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून भविष्यात ५०० खुर्च्यांचा हॉल जुन्या शाळेच्या जागेत प्रस्तावित आहे. मात्र तो वास्तवात आकारास येईल की  नाही याची शाश्वती नाही, समाज सेवेचे नाव धारण करणाऱ्या सोशल सर्व्हिस लीग संस्थेने एन दिवाळीच्या तोंडावर दोन महिन्यांचा  पगार देऊन नाट्यगृह  कर्मचाऱ्यांना कायमचे घरी बसवलं. डोअर किपर्सना  तर तेही मिळे नाही, याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबई