नियोजन : बारावी निकालाचा पेच कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:21+5:302021-07-02T04:06:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उद्या तब्बल एक महिना उलटणार ...

Planning: Twelfth result patch maintained | नियोजन : बारावी निकालाचा पेच कायम

नियोजन : बारावी निकालाचा पेच कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उद्या तब्बल एक महिना उलटणार असला तरी अद्याप शिक्षण मंडळाकडून त्याच्या निकालाची मूल्यमापनाचे सूत्र आणि पद्धती जाहीर करण्यात आलेली नाही. ३ जून २०२१ ला बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर शिक्षण मंडळ, तज्ज्ञ आणि शिक्षणमंत्र्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. दरम्यान, सीबीएसई मंडळाच्या मूल्यमापनाच्या धर्तीवर बारावी शिक्षण मंडळाच्या निकालाचे सूत्र मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार तयार करण्यात आले आहे. अंतिम निकष येत्या आज, उद्या २ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मूल्यमापनाचे सूत्र कसे आणि काय असेल याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे.

राज्यातील तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. सीबीएसईच्या निकालासाठी ३०:३०::४० असे सूत्र वापरण्यात आले असून त्याच धर्तीवर बारावी राज्य शिक्षण मंडळाच्या निकालासाठीही दहावी, अकरावीच्या गुणांचा विचार केल्याची माहिती मिळाली आहे.

अकरावीमुळे गुणांकनात घसरण होण्याची भीती

दरम्यान, सीबीएसईप्रमाणे राज्य शिक्षण मंडळानेही अकरावीच्या गुणांना ३० टक्के वेटेज दिल्यास आपल्या अंतिम गुणांकनात घसरण होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. २०१९-२० या वर्षात उशिरा सुरू केलेेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि उरलेल्या काही महिन्यांत पूर्ण न झालेला अभ्यासक्रम यांमुळे विद्यार्थ्यांनी स्वाध्याय, गृहपाठ, चाचण्या यांच्याकडे लक्ष न दिल्याने ते रेस्ट इयर म्हणूनच गेल्याच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. अशात जर अकरावीच्या गुणांचा अंतर्भाव बारावी निकालात होणार असेल तर निश्चितच निकाल खाली येण्याची भीती त्यांना वाटत आहे. या कारणास्तव राज्य शिक्षण मंडळ आता बारावीच्या मूल्यांकनासाठी नेमके काय सूत्र ठरवणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

गुणांचे समानीकरण होणे आवश्यक

बारावीच्या वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्णतः झाला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तर या काळात विशेष परिणाम झाला. अकरावीच्या वर्षात विद्यार्थी गंभीरपणे अभ्यास करत नाहीत. त्यामुळे अकरावी, बारावीच्या गुणांचे पूर्ण नियंत्रण हे महाविद्यालयांच्या हातात असणार आहे. अशात दहावीची परीक्षा ही शिक्षण मंडळाची असल्याने त्यात गुणांचे समानीकरण होण्यास मदत होईल आणि हुशार विद्यार्थ्यांवरही अन्याय होणार नाही

मुकुंद आंधळकर, समन्वयक, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना.

-----

अद्याप बारावीचा निकाल कसा आणि कुठल्या सूत्रावर लागणार हे निश्चित नसल्याने आम्हाला पुढील प्रवेशासाठी कुठला पर्याय निवडावा यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दहावी, अकरावीच्या गुणांचा अंतर्भाव असणार असेल तर आमच्या निकालाचा आम्ही त्यापद्धतीने अंदाज घेऊन पुढील प्रवेशाबाबत तरी निर्णय घेऊ शकतो. मात्र, अद्याप यातील काहीच झाले नसल्याने पदवी प्रवेशाच्या बाबतीत गोंधळ उडाला आहे.

मयूरी खापरे, बारावी, कला शाखा

बारावीचा निकालच यंदा उशिरा जाहीर होण्याची चिन्हे सध्यातरी असल्याने पदवी प्रवेशाला आणि त्यासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांनाही उशीरच होणार आहे हे निश्चित. शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होणार असल्याने कमीत कमी वेळात अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत पुढील काळात करावी लागणार आहे.

आशिष बनसोड, बारावी, विज्ञान शाखा

------

चौकट

राज्य मंडळाच्या बारावी मूल्यांकनाचे निकष जाहीर होण्याची शक्यता..

लाखो बारावीचे विद्यार्थी ज्याची वाट पाहताय त्या राज्य मंडळाच्या बारावी मूल्यांकनाचे निकष तयार झाले असून उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईप्रमाणेच दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्षाचे गुण ग्राह्य धरून अंतर्गत मूल्यमापन केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १२ वी च्या परीक्षांचे निकष जाहीर झाल्यानंतर ३१ जुलैपर्यंत या परीक्षांचा निका ही राज्य शिक्षण मंडळांनी जाहीर करायचा आहे. त्यामुळे निकालासाठी राज्य शिक्षण मंडळाला कमी वेळ मिळण्याची शक्यता असल्याने मूल्यमापनाचे निकष लवकरात लवकर जाहीर होणे अपेक्षित आहे.

-------------

मुंबई विभाग - बारावी विद्यार्थीसंख्या

मुले - १५१६९९

मुली - १४१०३९

तृतीयपंथी - ३०

एकूण २९२७६८

Web Title: Planning: Twelfth result patch maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.