Join us

नियोजन : बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षांबाबतीत सुरु असलेला गोंधळ विद्यार्थी व पालकांचा संभ्रम वाढवत आहे. दरम्यान, आगामी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षांबाबतीत सुरु असलेला गोंधळ विद्यार्थी व पालकांचा संभ्रम वाढवत आहे. दरम्यान, आगामी काळातले कोरोना महामारीचे संकट आणि तिसऱ्या लाटेत मुलांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेशिवायचा मार्ग तपासून पाहावा, असे मत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी पार पडलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीत मांडले. बहुतांश राज्यांची बारावी परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, सध्याच्या कोरोनास्थितीत प्रत्यक्ष केंद्रावर परीक्षा घेणे अवघड असल्याचे मत मांडले. याचबरोबर मूल्यांकनाची एकसमान पद्धत असावी, अशी गरजही यावेळी मांडली.

बारावीच्या परीक्षेनंतर व्यावसायिक आणि पदवी अभ्यासक्रमांची दारे उघडणार असल्याने बारावीतील गुणांना महत्त्व असते. मात्र, यंदाची परिस्थिती पाहून केवळ महत्त्वाच्या मुख्य परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावे, यासाठी मदत करावी, असा सूर पालक, विद्यार्थ्यांसह काही शिक्षकांमधून उमटत आहे. तर अनेकजण याच्याविरोधात असून, परीक्षा या व्हायलाच हव्यात, त्याशिवाय विद्यार्थ्यांना नवीन स्पर्धात्मक असणाऱ्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाची संधी देऊ नये, असे मत व्यक्त करत आहेत.

बारावीनंतर बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा विचार करावा, असे मत तज्ज्ञ मांडत आहेत. सोबतच सर्व शिक्षण मंडळांची एकसमान मूल्यांकन पद्धत असावी. याचबरोबर सर्व शाळांतील शिक्षक, विद्यार्थी यांचे लसीकरण होणेही आवश्यक असल्याचे मत ते मांडत आहेत. परीक्षांना कोणते पर्याय असतील, याबाबत चर्चा करताना विद्यार्थ्यांना घरी कार्यपुस्तिका देऊन परीक्षा घेणे, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करणे अशा विविध पर्यायांवर चर्चा करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने रविवार, २३ मे रोजी घेतलेल्या बैठकीत दोन पर्याय राज्यांसमोर ठेवले. यापैकी पहिल्या पर्यायानुसार, परीक्षा केंद्रांवर सीबीएसई बारावीच्या १९ प्रमुख विषयांची नियमित परीक्षा घ्यायची तर दुसऱ्या पर्यायानुसार कमी कालावधीत शाळास्तरीय परीक्षा घ्यावी, असा विचार आहे. या दोन्ही पर्यायांवर राज्य सरकारांकडून २५ मेपर्यंत विस्तृत सूचना मागविण्यात आल्या आहेत.

चौकट

बारावी विद्यार्थी संख्या - मुंबई विभाग

मुले- १,५१,६९९

मुली - १,४१,०३९

एकूण- २,९२,७३८

---------

विद्यार्थी प्रतिक्रिया

सद्यस्थितीत परीक्षा देणे म्हणजे कठीण पर्याय निवडण्यासारखे आहे. आमच्यामुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, हा मानसिक ताण परीक्षेहूनही जास्त वाटत आहे. शिवाय ऑफलाईन परीक्षेदरम्यान संसर्गाची लागण झालीच तर त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

- श्रुती पाटील, बारावीची विद्यार्थिनी

यंदा परीक्षेची तयारी कितीही केली तरी कमीच वाटत आहे, हा ताण आहेच पण त्याहून ही परीक्षा कशा होणार, कुठल्या पद्धतीने होणार, याचा तणाव अधिक आहे. मागील जवळपास दीड वर्षांपासून आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अभ्यास करत आहोत. ऑनलाईन एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेऊन लवकर यातून मोकळे करावे, हीच अपेक्षा आहे.

- क्रिश बुलानी, बारावीचा विद्यार्थी

गेल्या २ ते ३ महिन्यांपासून बारावी परीक्षांचा विषय रखडला आहे. परीक्षा घेण्यास आणखीन वेळ लावला तर पुढील प्रवेश परीक्षा आम्ही कधी देणार? कसा पुढच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणार? नवीन वर्षाच्या अभ्यासक्रमाला उशीर झाला तर पुढील वेळापत्रकही कोलमडणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या निर्णयाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची सुटका करावी.

- प्रेरणा कळंबे, बारावीची विद्यार्थिनी

------

शिक्षक - तज्ज्ञ प्रतिक्रिया

दहावीच्या परीक्षेप्रमाणे यंदाची बारावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात यावा आणि अंतर्गत मूल्यमापनाद्वारे पुढील प्रवेशासाठी मोकळे करावे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियांचा मार्ग मोकळा झाल्यास ते अडकून पडणार नाहीत.

- रविराज खाडे, शिक्षक

अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा यंदा मंडळाने घ्याव्यात आणि त्याप्रमाणे बारावी परीक्षांचे नियोजन करावे. कोरोना संसर्गाचा धोका जाणून आणि आरोग्य लक्षात घेऊन कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर त्यांच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा आयोजित करण्यात याव्यात, जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होऊ शकेल. शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु करण्याचा प्रयत्न करावा.

- मुकुंद आंधळकर, प्राध्यापक