लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विशेष गरजा किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा व परीक्षांमध्ये विशेषतः बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये आवश्यक त्या सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. याच धर्तीवर बोर्डाच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ, उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची सवलत, आवश्यकतेनुसार लेखनिक देणे बंधनकारक आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढत असताना लेखनिक मिळणे अवघड झाले आहे. ज्या संस्था लेखनिक पुरवितात त्यांच्याकडेही म्हणावी तशी नोंदणी यंदा झालेली नाही. त्यामुळे ऐन परीक्षेच्या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांची लेखनिकाअभावी गैरसोय होणार का? असा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईसह राज्यात वाढत असताना राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाईनच होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नियमित विद्यार्थ्यांच्या पालकांसह दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. सुरक्षितता, सामाजिक अंतर या नियमांचे पालन करून विद्यार्थी परीक्षा कशी देणार हा यक्षप्रश्न सामान्य पालकांपुढे उभा आहेच; मात्र दिव्यांगांचे पालक जास्त चिंतेत आहेत. बोर्डाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यादीत २२ प्रकार नमूद केले आहेत. यामध्ये अंशतः अंध, पूर्णतः अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, अध्ययन अक्षम, स्वमग्न, सेरेबल पाल्सी, मतिमंद अशा विविध व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. आधीच आजारी असलेल्या या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षांना या काळात बसविणे म्हणजे कोरोना संसर्गाला समोरून निमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत पालक व्यक्त करीत आहेत. त्यातच यंदा लेखनिकाची नोंदणी आणि उपलब्धता होत नसल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची तरी कशी, हा प्रश्न पालकांना सतावत आहे.
-------
पालक प्रतिक्रिया
यंदा परीक्षेचा अर्ज जरी आम्ही भरला असला तरी पुढील प्रक्रिया होणे बाकी आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आणि मुलाची सुरक्षितता लक्षात घेऊन यंदाची परीक्षा न देण्याचाच विचार आम्ही करीत आहोत. एका वर्षाचा ड्रॉप जर मुलाची सुरक्षिततेची हमी देणारा असेल तर आम्ही त्याचाच स्वीकार करू.
अभिषेक राजवाडे, पालक
-----
माझा मुलगा अंध असल्याने साहजिकच आम्हाला लेखनिकाची गरज घेणे आवश्यकच असणार आहे. मात्र, संसर्गाचे प्रमाण वाढल्याने कुणीही लेखनिक उपलब्ध होत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. जर लेखनिक उपलब्ध होत नसेल तर मंडळाकडे विशेष अर्ज करण्यापलीकडे आमच्याकडे पर्याय राहणार नाही.
राजश्री सांगुर्डे , पालक
.....
यंदा नियमित आणि दिव्यांग दोन्ही विद्यार्थ्याना ऑफलाईन परीक्षांची भीती आहेच. लेखनिक न मिळाल्याने ऑफलाईन परीक्षांमध्ये अडचण निर्माण होणारच आहे. मात्र, जर ऑनलाईन मूल्यमापनाचा विचार झालाच तर मंडळाने विचार करून त्यासाठी ही दिव्यांगांच्या दृष्टीने सोय करावी ही विनंती आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावरच यंदा दिव्यांग विद्यार्थ्यांचा विचार करावा, ही विनंती आहे.
----------
कोट
अद्याप नोंदणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आताच परिस्थिती सांगता येणार नाही. लेखनिकाची मागणी ही परीक्षेच्या आधी महिना, १५ दिवस याआधी येत असते. मात्र, नियोजनाप्रमाणे मंडळाकडून दिव्यांगांना मिळणाऱ्या सर्व सुविधा दरवर्षीप्रमाणे पुरविल्या जाणार याची खात्री बाळगावी.
सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ
-------------
शैक्षणिक वर्ष २०२०-२१
दहावीचे राज्यातील दिव्यांग विद्यार्थी - ८५२२
बारावीचे राज्यातील दिव्यांग विद्यार्थी - ६३७४