मैदान, उद्यानांच्या नव्या धोरणाचा वाद स्वगृही
By admin | Published: January 23, 2016 03:20 AM2016-01-23T03:20:08+5:302016-01-23T03:20:08+5:30
मैदाने व उद्यानांच्या नव्या धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे अडचणीत आलेले भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या संस्थेच्या ताब्यातील भूखंड
मुंबई : मैदाने व उद्यानांच्या नव्या धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे अडचणीत आलेले भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या संस्थेच्या ताब्यातील भूखंड पालिकेला परत केले़ मात्र हे धोरण रद्द करण्यासाठी ठेकेदारांची लॉबी सक्रिय असल्याचा आरोप करीत स्वपक्षीय नेत्यांकडेच त्यांनी संशयाची सुई फिरवली होती़ त्यात आता या भूखंडांचा ताबा शेट्टी यांच्याकडेच ठेवण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी मोर्चा काढला़ मात्र हा मोर्चा म्हणजे शेट्टी यांचे शक्तिप्रदर्शन असून भूखंड परत मिळवण्यासाठी दबावतंत्र असल्याची चर्चा भाजपाच्या गोटातच रंगली आहे़
मैदाने व उद्याने काळजीवाहू तत्त्वावर देण्याचे धोरण रद्द ठरवून पालिकेने नवीन धोरण आणले़ त्यानुसार दत्तक तत्त्वावर मैदाने खासगी संस्थांकडे देखभालीसाठी देण्यात येणार आहेत़ मात्र पालिकेच्या महासभेत मंजूर झालेले हे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देत २१६ भूखंड परत घेण्याचे आदेश आयुक्तांना दिले़ यापैकी बोरीवली आणि दहिसर येथील तीन भूखंड गोपाळ शेट्टी यांच्या संस्थेकडे असल्याने भाजपाचीच कोंडी झाली होती़ अखेर शेट्टी यांनी या भूखंडांचा ताबा १ फेब्रुवारीपासून
सोडत असल्याचे जाहीर केले़ प्रत्यक्षात पक्षांतर्गत दबावामुळे त्यांना हा निर्णय घेणे भाग पडल्याचे सूत्रांकडून समजते़
त्यांची ही नाराजी पत्रकार परिषदेतही दिसून आली होती़ वीर सावरकर उद्यान, पोईसर जिमखाना आणि कमला विहार उद्यानाची देखभाल यापुढे पालिकेने करावी, असे आव्हानही त्यांनी दिले़ मात्र ठेकेदारांची लॉबी हे धोरण रद्द करण्यासाठी सक्रिय होती, असा संशय त्यांनी व्यक्त केला़
एकीकडे मैदाने परत करीत असताना त्यांच्या वॉर्डात वीर सावरकर मैदान व पोयसर जिमखाना बचाव समिती स्थापन झाली आहे़ या समितीने मोर्चा काढून या मैदानांचा ताबा पुन्हा शेट्टी यांच्या संस्थांकडेच देण्याची मागणी
केली़ शेट्टींच्या या खेळीमुळे
स्वपक्षीय अचंबित झाले आहेत़ (प्रतिनिधी)