अवयवदान करणाऱ्यांच्या नावाने झाड लावून, त्यावर त्यांच्या नावाची पाटी लावा, अंत्यसंस्काराच्या वेळी सरकारी अधिकाऱ्याने उपस्थित राहावे - डॉ. कृष्ण कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 11:58 AM2023-01-06T11:58:00+5:302023-01-06T11:58:14+5:30
के. ई. एम. रुग्णालयात गुरुवारी त्वचा (स्किन) बँकेचे उद्घाटन डॉ. कृष्ण कुमार यांच्या हस्ते झाले.
मुंबई : एखादी व्यक्ती मेंदूमृत झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यास किमान आठ जणांना जीवनदान मिळते. अवयवदान केल्यानंतर कालांतराने दात्याच्या कुटुंबीयांचा तसेच अवयवदात्याचा विसर पडतो. आपल्याला ज्यांच्याकडून जीवनदान मिळाले आहे त्यांच्याप्रति, त्यांच्या कुटुंबीयांप्रति कृतज्ञता दर्शविण्यासाठी अवयवदात्याच्या नावाने झाड लावावे, त्यावर त्या व्यक्तीच्या नावाची पाटी लावावी, तसेच त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी सरकारी अधिकाऱ्याने आवर्जून उपस्थिती लावावी, अशा बहुमूल्य सूचना लवकरच सर्व राज्यांना केल्या जाणार असल्याची माहिती नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनचे (नोटो) संचालक डॉ. कृष्ण कुमार यांनी दिली.
के. ई. एम. रुग्णालयात गुरुवारी त्वचा (स्किन) बँकेचे उद्घाटन डॉ. कृष्ण कुमार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्वचा दान हे महत्त्वाचे दान आहे. मात्र, त्याविषयी फारशी जनजागृती आपल्याकडे नाही. जळीत रुग्णांवरील उपचारांत त्वचेची भूमिका मोठी असते. त्यामुळे या त्वचादानाची गरज ओळखून महापालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयात स्किन बँक सुरू करण्यात आली आहे.
डॉ. कृष्ण कुमार पुढे म्हणाले, ‘अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांना कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा देता येत नाही. मात्र, आपण किमान त्या कुटुंबीयांना सन्मान करू शकतो. एखादी मोठी भिंत शहरात उभारून त्या व्यक्तीचे नाव त्यावरून लिहून ठेवू शकतो. या अशा गोष्टीमुळे अवयवदानाला चालना मिळेल. अवयवदानाची संख्या आपण वाढवू शकतो. एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळच्या व्यक्तीऐवजी मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव मिळायला हवेत. मेंदूमृत अवयवदान वाढीसाठी लोक चळवळीची गरज आहे. यामध्ये सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे’.
अवयव वाहतुकीसाठीचा बॉक्सही बदलणार
अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सध्या मोठ्या बॉक्सचा वापर केला जातो. विमानातून ते अन्यत्र नेले जात असताना एक आसन आरक्षित करावे लागते.
त्याचा खर्च ज्या रुग्णाला अवयव मिळणार आहे त्याच्याकडून वसूल केला जातो. परिणामी खर्चात वाढ होते.
या पार्श्वभूमीवर आयआयटीसारख्या अन्य संस्थांबरोबर वेगळे असे काही बॉक्स बनविता येतील का, यावर काम सुरू आहे. तसेच त्या बॉक्समध्ये योग्य तापमान राहील याची काळजी घेतली जाणार आहे.