Join us

पाणी योजनेच्या विहिरीसाठी झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2015 11:05 PM

पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीसाठी बारामती शहरातील नीरा डाव्या कालव्यालगतच्या सुमारे ३० झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

बारामती : पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीसाठी बारामती शहरातील नीरा डाव्या कालव्यालगतच्या सुमारे ३० झाडांची कत्तल करण्यात आली आहे. गोजुबावी पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीसाठी पाटबंधारे खात्याच्या जागेतील ही झाडे काढण्यात आली आहेत, असे खात्याच्या सुत्रांनी सांगितले. शहराच्या पाणीपुरवठा योजनेजवळ असणाऱ्या तीनमोरी लगतची ही झाडे तोडण्यात आली आहेत. १० ते १५ वर्षांची ही झाडे आहेत. दाट झाडांचा हा परीसर आहे. या बाबत शहरातील काही नागरीकांनी येथील नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशन च्या पदाधिकाऱ्यांना माहीती दिली. त्यामुळे संस्थेचे पदाधिकारी बबलु कांबळे, फय्याज शेख, विवेक पांडकर, सचिन जानराव, श्रीकांत पवार, सोनेश बांदल आदींनी या ठिकाणी धाव घेतली. भर दिवसा सुरु असलेली वृक्षतोड पाहुन सर्वजण संतापले. मात्र,येथील कामगारांनी तळ्याच्या कामासाठी वृक्षतोड सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ ला या बाबत माहीती दिली.या पार्श्वभूमीवर पाटबंधारे खात्याशी संपर्क साधल्यानंतर रितसर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळाली. येथील कालवा निरीक्षक राजू ननवरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, संबंधित जागा गोजुबावी ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आली आहे. या दोन गुुंठे जागेवर योजनेसाठी विहीर खोदण्यात येणार आहे. त्यासाठी रितसर निविदा काढुन झाडे तोडण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीला भाडेतत्वावर ही जागा देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कालव्याला धोका...निरा डावा कालव्यालगतचा परीसर दाट झाडांचा आहे. ही झाडे मुळातच कालव्याच्या सुऱिक्षततेसाठी लावण्यात आली आहेत. पाणी पुरवठा योजनेसाठी झाडे काढण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, झाडे काढल्यामुळे निरा डावा कालव्याला धोका निर्माण झाला आहे. तोडण्यात आलेल्या झाडांनंतर कालवा सुरक्षिततेसाठी आणखी झाडांची लागवड करण्याची गरज आहे. पाटबंधारे खात्याने नव्याने झाडांची लागवड करावी,अशी मागणी ‘एनएफओ’चे प्रमुख बबलु कांबळे यांनी केली आहे. याबाबत निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.