लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर मुंबईत वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी येथील स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी एक आगळावेगळा संकल्प केला आहे. उत्तर मुंबईतील कोणत्याही संस्थेने त्यांच्या आवारात जर पाच झाडे लावल्यास अशा सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. वृक्षारोपणाबाबत अधिक जागरूक राहून पावसाळ्याअगोदरच पूर्व तयारी करून वृक्षारोपण केले तर त्याला जास्त महत्त्व प्राप्त होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर मुंबईतील सर्व भाजप नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात वृक्षारोपण करावे, असेही त्यांनी आवाहन केले. खासदार गोपाळ शेट्टी यांनी पोयसर जिमखाना आयोजित वृक्षारोपण समारंभात सोमवारी वृक्षारोपण करून प्रारंभ केला. १०० वृक्षांचे रोपण पोयसर जिमखाना आणि ५० सामाजिक संस्था द्वारा एक हजार वृक्ष वितरित केले गेले. पोयसर जिमखान्याने या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल मुकेश भंडारी, करुणाकर शेट्टी, नितीन प्रधान यांचे खासदार शेट्टी यांनी कौतुक केले. यावेळी उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, जिल्हा महासचिव बाबा सिंह, दिलीप पंडित, निखिल व्यास, मुंबई सचिव योगेश दुबे, आदी मान्यवर उपस्थित होते. निशाद कोरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.