मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईकारांनी पुढाकार घ्यावा, ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा मंत्र आपला मानावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. एकेकाळी मुंबई शहरात पुरेशी झाडे होती. पण सध्या झाडांचे प्रमाण अत्यंत कमी होत चालले आहे. मुंबईला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी वृक्ष संवर्धन करावे, असे आवाहन उपमहापौर अलका केरकर यांनी केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मुलुंड पूर्वेकडील डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उद्यान येथे दोन दिवसीय झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. शनिवारी, केरकर यांंच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी स्थानिक आमदार सरदार तारासिंह, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य अभिजित चव्हाण, टी विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव, महापालिका चिटणीस नारायण पठाडे, उद्यान अधीक्षक विजय हिरे यांची उपस्थिती होती. केरकर पुढे म्हणाल्या की, बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात १९ वर्षांपासून झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन भरविले जाते. सगळ््याच मुंबईकरांना हे प्रदर्शन पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांतही असे प्रदर्शन व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींची होती. या मागणीची दखल प्रशासनाने घेऊन यंदापासून पूर्व व पश्चिम उपनगरांत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईकरांना विविध प्रकारच्या वृक्षांची, फळांची आणि भाज्यांची माहिती होईल. त्याचबरोबर या वृक्षांविषयी आपुलकीही निर्माण होईल. पालिकेची उद्याने ही मोकळा श्वास देणारी ठिकाणे आहेत. या उद्यानांत लहान मुलांना विविध खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आदी निर्माण करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
महानगरात झाडे लावा, झाडे जगवाचा जप!
By admin | Published: March 02, 2015 3:29 AM